स्पोर्ट्स

Team India criticism : ‘टीम इंडिया सर्वोत्तम संघ नाही, ते फक्त नशिबवान!’, इंग्लंडच्या माजी गोलंदाजाची बोचरी टीका

Debate over Team India strategy : भारताच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित

रणजित गायकवाड

Team India Not the Best Just Lucky Former England Bowler criticize

लंडन : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ८ मार्च रोजी न्यूझीलंडचा पराभव करून तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक उंचावला. यजमान भारताने जेतेपद राखून इतिहास रचला असला, तरी इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टीव्ह हार्निसन याने मात्र भारताच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘भारतीय संघ या स्पर्धेतील सर्वोत्तम संघ नव्हता, त्यांनी केवळ निर्णायक क्षण जिंकले,’ असे विधान हार्निसनने केले आहे.

‘दक्षिण आफ्रिकाच सर्वोत्तम संघ’

टॉकस्पोर्ट (talkSPORT) या यूट्यूब चॅनेलवर बोलताना हार्निसन म्हणाला की, संपूर्ण स्पर्धेचा विचार करता दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतापेक्षा सरस होता. त्याच्या मते, भारताने नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा ९६ धावांनी धुव्वा उडवला असला, तरी संपूर्ण स्पर्धेत ते सातत्य राखू शकले नाहीत. भारताला या स्पर्धेत एकमेव पराभव दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पत्करावा लागला होता.

हार्निसनने पुढे नमूद केले की, ‘अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांच्या भागीदारीमुळे भारताने अंतिम सामना जिंकला. तसेच, सपाट खेळपट्ट्यांवर जसप्रीत बुमराहने केलेला मारा निर्णायक ठरला. मात्र, माझ्या मते दक्षिण आफ्रिका हा अधिक चांगला संघ होता. भारताने केवळ मोक्याच्या क्षणी खेळ उंचावला, पण सर्वसमावेशक कामगिरीत ते मागे पडले.’

मोठ्या सामन्यांतील दडपण हाताळण्यात भारत यशस्वी

भारताच्या प्रवासाचे विश्लेषण करताना हार्निसन म्हणाला, ‘साखळी फेरीत भारतीय संघ फारसा प्रभावी वाटला नाही. अमेरिकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्यांची अवस्था बिकट झाली होती. उपांत्यपूर्व फेरीत वेस्ट इंडिजविरुद्धही त्यांना संघर्ष करावा लागला. मात्र, भारताकडे 'बिग मॅच विनर्स' खेळाडू असल्याने खराब खेळ करूनही त्यांनी विजयाचे मार्ग शोधले. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा संघ अधिक सातत्यपूर्ण होता, पण एका खराब दिवसामुळे (न्यूझीलंडविरुद्धची उपांत्य फेरी) त्यांचे आव्हान संपुष्टात आले.’

भारताची विश्वचषकातील कामगिरी

  • साखळी फेरी : अमेरिका, नामिबिया, पाकिस्तान आणि नेदरलँड्स या सर्व संघांचा पराभव करून भारताने दिमाखात आगेकूच केली.

  • उपांत्य फेरी : इंग्लंडविरुद्धच्या चुरशीच्या सामन्यात विजय मिळवून भारताने अंतिम फेरीत धडक मारली.

  • अंतिम सामना : संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि इशान किशन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने ५ बाद २५५ अशी विशाल धावसंख्या उभारली आणि न्यूझीलंडवर ९६ धावांनी विजय मिळवला.

भारताने घरच्या मैदानावर विश्वचषक जिंकणारा आणि टी-२० मध्ये सलग दुसऱ्यांदा जेतेपद मिळवणारा पहिला संघ होण्याचा मान पटकावला असला, तरी हार्निसनच्या या विधानामुळे क्रिकेट वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT