स्पोर्ट्स

Team India Record : तोडला, फोडला, मोडीत काढला! टीम इंडियाचा 'बाऊंड्री' विक्रम; 30 वर्षांपूर्वीचे ऑस्ट्रेलियाचे रेकॉर्ड धुळीस

याआधी 1964 साली भारतीय संघाने एका कसोटी मालिकेत 384 चौकार-षटकार लगावले होते.

रणजित गायकवाड

इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय फलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या मालिकेत धावांचा डोंगर उभारण्यासोबतच भारतीय संघाने चौकार आणि षटकारांची बरसात करत एक नवा विश्वविक्रम आपल्या नावे नोंदवला आहे. भारतीय फलंदाजांनी या मालिकेत एकूण 422 चौकार आणि 48 षटकार ठोकले, म्हणजेच एकूण 470 वेळा चेंडू सीमारेषेपार धाडला. एकाच कसोटी मालिकेत सर्वाधिक चौकार-षटकार मारण्याचा हा नवा जागतिक विक्रम आहे. यापूर्वी, ऑस्ट्रेलियाने 1993 च्या ॲशेस मालिकेत 460 (451 चौकार आणि 9 षटकार) वेळा चेंडू सीमारेषेपार पाठवून हा विक्रम केला होता, जो आता भारताने मोडित काढला आहे.

भारताची ऐतिहासिक कामगिरी

ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा भारतीय फलंदाजांनी कोणत्याही कसोटी मालिकेत 400 पेक्षा अधिक चौकार-षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे. याआधी 1964 साली भारताने एका कसोटी मालिकेत 384 चौकार-षटकार लगावले होते. यंदा 470 चौकार-षटकारांसह भारताने केवळ आपला जुना विक्रमच मोडला नाही, तर जागतिक स्तरावर एक नवा कीर्तिमान प्रस्थापित केला आहे.

12 शतकांचा अनोखा विक्रम

या मालिकेत भारतीय फलंदाजांनी आणखी एक शानदार कामगिरी केली आहे. भारताच्या 12 फलंदाजांनी या कसोटी मालिकेत शतके झळकावली आहेत. यापूर्वी ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या संघांनी एका कसोटी मालिकेत 12 फलंदाजांकडून शतके नोंदवण्याचा पराक्रम केला आहे. भारताने याआधी 1978-79 च्या कसोटी मालिकेत 11 फलंदाजांसह शतक नोंदवण्याचा विक्रम केला होता.

ओव्हल कसोटीत इंग्लंडसमोर डोंगराएवढे आव्हान

ओव्हल कसोटी, भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 374 धावांचे विशाल लक्ष्य ठेवले. भारताच्या दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालने 118 धावांची शानदार शतकी खेळी केली. नाईट वॉचमन म्हणून आलेल्या आकाश दीप याने 66, तर अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी 53 धावांचे मोलाचे योगदान दिले. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने एका गड्याच्या मोबदल्यात 50 धावा केल्या होत्या. त्यानंतर सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लिश संघाने उपहारापर्यंत 3 विकेट गमावून 164 धावांपर्यंत मजल मारली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT