team india a vs england lions yashasvi jaiswal flop performance
आयपीएलचा अंतिम सामना 3 जून रोजी खेळवला जाणार आहे. त्यापूर्वीच भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेचे वातावरण तयार होऊ लागले आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 20 जूनपासून खेळला जाणार आहे. त्याआधी भारताचा अ संघ आणि इंग्लंड लायन्स यांच्यात लढत सुरू झाली आहे. मात्र या सामन्यात ज्या खेळाडूकडून सर्वात जास्त अपेक्षा होत्या त्यानेच निराश केली आहे. इंडिया अ संघाकडून खेळताना सलामीवीर यशस्वी जैस्वाल स्वस्तात बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला.
भारत अ संघाची धुरा अभिमन्यू ईश्वरनकडे सोपवण्यात आली आहे. या संघात कसोटी संघातील अनेक खेळाडूंचाही समावेश आहे. भारत अ आणि इंग्लंड लायन्स यांच्यातील सामना सुरू झाला तेव्हा कर्णधार अभिमन्यू ईश्वरन आणि यशस्वी जैस्वाल डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरले. संघाची धावसंख्या फक्त 12 असताना कर्णधार ईश्वरन 8 धावा करून बाद झाला.
करुण नायर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने आणि जैस्वालने काही वेळ संघर्ष केला. संघाचे अर्धशतक धावफलकावर झळकावले. पण 51 धावांवर जैस्वाल बाद झाला. त्याने 55 चेंडूत 24 धावांची खेळी केली. या दरम्यान त्याच्या बॅटमधून तीन चौकार आणि एक षटकार आला. भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेपूर्वी जैस्वाल मोठी आणि उत्कृष्ट खेळी खेळेल अशी अपेक्षा होती, पण तो अपयशी ठरला.
भारतीय संघाला सुरुवातीचे धक्के सहन करावे लागले. त्यानंतर करुण नायर आणि सर्फराज खान यांनी संघाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला, परंतु जैस्वालची स्वतात पडलेली विकेट हा संघाला मोठा धक्का मानला आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची प्लेईंग इलेव्हन कशी असेल हे अद्याप स्पष्ट नाही, पण या सामन्यात यशस्वी जैस्वाल सलामीला उतरताना दिसेल हे निश्चित आहे. त्यामुळे जर इंग्लंड लायन्स विरुद्धच्या खराब कामगिरीची पुनरावृत्ती पहिल्या कसोटीत कायम राहिली तर टीम इंडियावरील ताण आणखी वाढू शकतो.
जैस्वालने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघासाठी चांगली फलंदाजी केली. पण इंग्लंडमध्ये त्याची बॅट चालली नाही तर ती मोठी समस्या असेल. तथापि, लायन्स विरुद्धच्या सामन्याचा दुसरा डाव अजूनही बाकी आहे आणि त्यानंतर आणखी एक सामना असेल, ज्यामध्ये जैस्वालला मोठी खेळी खेळण्याची आणि टीम इंडियाला थोडासा सुटकेचा श्वास घेण्याची संधी मिळेल.