प्रातिनिधिक छायाचित्र.  File Photo
स्पोर्ट्स

T20 World Cup Controversy : बांगलादेशची शेपूट वाकडी ते वाकडीच! म्‍हणे, "भारतात क्रिकेट खेळणार..."

'आयसीसी'ची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे 'बीसीबी'सोबत बैठक

पुढारी वृत्तसेवा

Bangladesh Cricket Board Statement on T20 WC

ढाका : एकीकडे आपल्‍या देशात हिंदूना लक्ष्‍य करणारे बांगलादेशने भारतात क्रिकेट न खेळण्‍याचे आपले रडगाणे सुरुच ठेवले आहे. २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी भारतात खेळणार नसल्याचा पुनरुच्चार बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसोबतच्या (आयसीसी) बैठकी केला आहे.

'आयसीसी'ची 'बीसीबी'बरोबर चर्चा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि बांगलादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी)मधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी आयसीसीने आज (दि.१३) बीसीबीसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. यावेळ ७ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान भारत आणि श्रीलंकेत खेळल्या जाणाऱ्या आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मध्ये बांगलादेशच्या राष्ट्रीय पुरुष संघाच्या सहभागावर चर्चा करण्यात आली. या बैठकीला बीसीबीचे अध्यक्ष मोहम्मद अमीनुल इस्लाम, उपाध्यक्ष मोहम्मद शकावत हुसेन आणि फारूक अहमद, संचालक आणि क्रिकेट ऑपरेशन्स समितीचे अध्यक्ष नझमुल अबेदीन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निजामुद्दीन चौधरी उपस्थित होते, अशी माहिती बीसीबीने एका प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव भारतात न खेळण्‍याचा पुनरुच्‍चार

चर्चेदरम्यान, बीसीबीने सुरक्षेच्या कारणास्तव या स्पर्धेसाठी भारतात न जाण्याच्या आपल्या निर्णयाचा पुनरुच्चार केला. खेळाडूंच्या सुरक्षेच्या हितासाठी बांगलादेशचे सामने भारतातील ठिकाणांव्यतिरिक्त इतरत्र आयोजित करण्याचा विचार करावा, असे आवाहन बोर्डाने पुन्हा एकदा आयसीसीला केले.

भूमिकेचा पुनर्विचार करण्‍याची आयसीसीची सूचना

तथापि, आयसीसीने स्पर्धेचे वेळापत्रक आणि कार्यक्रम आधीच निश्चित झाल्याचे निदर्शनास आणून दिले आणि बीसीबीला आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करण्यास सांगितले. या सूचनेनंतरही बांगलादेश बोर्ड आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. आपल्या खेळाडू, अधिकारी आणि सपोर्ट स्टाफची सुरक्षा आणि कल्याण हीच आपली सर्वोच्च प्राथमिकता असल्‍याचे पालुपद लावले. संभाव्य तोडगा काढण्यासाठी आणि परस्पर स्वीकारार्ह निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी चर्चा सुरू ठेवण्यास बीसीबी आणि आयसीसी दोन्ही सहमत झाले आहेत.

IPLमधून मुस्तफिझुरला वगळल्‍यानंतर 'बीसीबी'ला खेळाडूंच्‍या सुरक्षेची चिंता

बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांवरील हिंसाचाराच्या वारंवार येणाऱ्या वृत्तांनंतर भारतात झालेल्या राजकीय प्रतिक्रियेनंतर, बीसीसीआयने बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिझुर रहमानचा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधील करार रद्द केल्याने दोन्ही बोर्डांमधील संबंध बिघडले. बीसीसीआयच्या निर्देशानंतर, कोलकाता नाइट रायडर्सने मुस्तफिझुरला संघातून वगळले, ज्यामुळे बीसीबीला तातडीची उच्चस्तरीय बैठक बोलावावी लागली. त्यानंतर, बांगलादेशने खेळाडूंच्या सुरक्षेच्या चिंतेमुळे त्यांचे टी-२० विश्वचषकाचे सामने भारतातून बाहेर हलवण्याची विनंती करत आयसीसीला औपचारिकपणे पत्र लिहिले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT