स्पोर्ट्स

Team India : रणनीती की शरणागती? द. आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाच्या ‘फ्लॉप शो’ची ‘ही’ आहेत ७ कारणे

भारतीय संघ व्यवस्थापनाच्या 'ओव्हर-स्मार्टनेस'चा नाहक फटका

रणजित गायकवाड

अहमदाबाद : क्रिकेटमध्ये असं म्हणतात की, ‘विजय सर्व चुका झाकून टाकतो, पण पराभव वास्तव समोर आणतो.’ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ७६ धावांच्या लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघाच्या बाबतीतही हेच घडलं आहे. जगातील नंबर वन टी२० संघ असूनही अशा मोठ्या फरकाने पराभूत होणं हे केवळ एक पराभव नसून भारतीय रणनीतीतील ‘भेगा’ उघड करणारं लक्षण आहे.

१. द. आफ्रिकेच्या मध्य फळीतील फलंदाजांची समयसूचकता

दक्षिण आफ्रिकेची सुरुवात अत्यंत खराब झाली होती; संघाने अवघ्या २० धावांत ३ फलंदाज गमावले होते. मात्र, त्यानंतर डेव्हिड मिलर (३५ चेंडूंत ६३ धावा) आणि डेवाल्ड ब्रेविस यांनी ९७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत सामन्याचे चित्र पालटले. या जोडीने वरुण चक्रवर्तीला लक्ष्य करत त्याच्या ४ षटकांत ४७ धावा कुटल्या. कर्णधार एडन मार्क्रमने सामन्यानंतर सांगितले की, ‘मध्यंतराच्या षटकांत गॅप शोधून धावफलक हलता ठेवण्याच्या रणनीतीमुळे आम्ही सन्मानजनक धावसंख्या उभारू शकलो.’

२. बुमराहचा 'मॅजिक' स्पेल पण आफ्रिकेचा 'मास्टरक्लास'

बुमराह प्रत्येक स्पेलमध्ये अधिक सरस वाटतो. क्विंटन डिकॉकला टाकलेली लेन्थ बॉल असो किंवा रिकल्टनला टाकलेला तो 'डिसेप्टिव्ह स्लोअर बॉल', बुमराह हा खऱ्या अर्थाने एक जादूगार आहे. पण दुसऱ्या बाजूला, वरुण चक्रवर्ती आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा दिवस खराब होता. भारतीय फिरकीपटूंच्या पहिल्या ३ ओव्हर्समध्ये ३९ धावा गेल्या आणि तिथेच दक्षिण आफ्रिकेला मोमेंटम मिळाला. डेव्हिड मिलर आणि डेवाल्ड ब्रेविस यांच्यातील ९७ धावांच्या भागीदारीने सामना भारताच्या हातातून हिरावून घेतला.

३. निवड प्रक्रियेत 'ओव्हरथिंकिंग' नडले?

सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, अक्षर पटेलसारख्या अनुभवी उपकर्णधाराला बाहेर का ठेवले गेले? मॅचअप्सच्या नादात आपण वॉशिंग्टन सुंदरला खेळवले, पण जेव्हा डावखुरा फलंदाज मैदानावर होता, तेव्हा सुंदरला गोलंदाजी देण्याचा आत्मविश्वास कर्णधाराकडे नव्हता. आफ्रिकेने केशव महाराजवर विश्वास दाखवला, तर आपण आपल्या मॅचविनेरला का डावलले? हा 'ओव्हरथिंकिंग'चा प्रकार भारताला महाग पडला.

४. भारतीय फलंदाजीतील ताठरपणा

फलंदाजीमध्ये लवचिकतेचा अभाव स्पष्टपणे दिसून आला. जेव्हा विकेट्स पडत होत्या, तेव्हा सूर्यकुमार यादवला तिसऱ्या क्रमांकावर पाठवून डाव सावरता आला असता. पण आपण आपल्या ठरलेल्या क्रमालाच चिटकून राहिलो. मार्को यानसेनचा 'नकल बॉल' आणि लुंगी एन्गिडीची 'स्लोअर वन' यांनी भारतीय फलंदाजीला पूर्णपणे जखडून ठेवले. अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांच्याकडे केवळ मोठा फटका मारण्याचाच पर्याय दिसला, टायमिंग आणि गॅप शोधण्याऐवजी आपण फक्त ताकदीचा वापर करायला गेलो आणि विकेट्स गमावल्या.

५. 'आर्ट ऑफ चेसिंग' आपण विसरलो का?

गेल्या काही काळापासून भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करण्यावर जास्त भर दिला आहे. २०१६ च्या वर्ल्ड कप सेमीफायनलमधील अनुभवानंतर, ‘दव’ पडल्यानंतरच्या परिस्थितीत गोलंदाजांना सराव मिळावा म्हणून आपण मुद्दाम आधी बॅटिंग स्वीकारत होतो. पण या प्रक्रियेत आपण ‘लक्ष्याचा पाठलाग’ करण्याची कला गमावली आहे का?

आकडेवारी सांगते की, आशिया कपनंतर १८० पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करताना भारताने चारपैकी फक्त एकच सामना जिंकला आहे. १८०+ धावांचा पाठलाग हा केवळ फटकेबाजीचा खेळ नसून ते एक गणित आहे. विराट कोहलीला 'चेस मास्टर' का म्हणतात, कारण त्याला माहित होतं की धावांचा वेग कधी वाढवायचा आणि कधी खेळपट्टीवर टिकून राहायचं. सध्याच्या संघात ती परिपक्वता या सामन्यात दिसली नाही.

६. लुंगी एन्गिडीकडून भारतीय फलंदाजांना लगाम

दक्षिण आफ्रिकेच्या या ऐतिहासिक विजयाचा खरा शिल्पकार वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडी ठरला. त्याने आपल्या ४ षटकांच्या स्पेलमध्ये एकही बळी मिळवला नसला, तरी केवळ १५ धावा खर्च करत भारतीय फलंदाजांना जखडून ठेवले. खेळपट्टीचा अचूक अंदाज घेत एन्गिडीने 'ऑफ-कटर' आणि 'स्लोअर बाऊन्सर'चा खुबीने वापर केला. त्याच्या या संथ गतीच्या चेंडूंनी भारतीय फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून रोखले, ज्यामुळे धावगतीवर कमालीचे नियंत्रण आले.

७. मार्को यान्सेनची धारदार गोलंदाजी

उंचपुऱ्या मार्को यान्सेनने भारतीय फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्याने २२ धावांच्या बदल्यात ४ मोलाचे बळी टिपले. त्याच्या चेंडूंना मिळणारी अतिरिक्त उसळी आणि अचूक टप्प्यामुळे भारतीय फलंदाज सपशेल अपयशी ठरले. क्षेत्ररक्षणाची चोख तटबंदी आणि गोलंदाजांमधील ताळमेळ पाहता, या महत्त्वाच्या सामन्यासाठी टीम इंडियाची रणनीती फोल ठरल्याचे स्पष्टपणे दिसून आले.

सेमीफायनलचे समीकरण: आता भवितव्य इतरांच्या हातात?

द. आफ्रिकेविरुद्धच्या पराभवामुळे भारताने आपले नशिब आता दुसऱ्यांच्या हातात सोपवले आहे. सेमीफायनलमध्ये कसे पोहचायचे याची समीकरणे वेगवेगळी असणार आहेत.

  • द. आफ्रिकेने त्यांचे पुढचे दोन्ही सामने (वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे विरुद्ध) जिंकावेत.

  • भारताने झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजला मोठ्या फरकाने पराभूत करावे.

जर हे घडलं, तर भारत आरामात पुढे जाईल. पण जर या समीकरणात थोडाही बदल झाला, तर नेट रनरेटचा खेळ भारतासाठी कठीण होऊ शकतो.

द्विपक्षीय मालिकेत सपाट खेळपट्ट्यांवर धावा कुटून आपण कदाचित थोडे 'ओव्हर कॉन्फिडंट' झालो होतो. आयसीसी टूर्नामेंटमध्ये खेळपट्ट्या वेगळ्या असतात आणि तिथे 'व्हेरिएशन्स'समोर आपण संघर्ष करतोय हे मान्य करावं लागेल. पॅनिक बटन दाबायची गरज नाही, पण सरावामध्ये आणि रणनीतीमध्ये मोठे बदल करण्याची हीच वेळ आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT