T20 World Cup 2026 Pudhari
स्पोर्ट्स

T20 World Cup 2026: T20 वर्ल्ड कपआधी नवा वाद! पाकिस्तान काळी पट्टी बांधून खेळणार? आयसीसीचे नियम काय सांगतात?

Pakistan Black Armband Controversy: T20 वर्ल्ड कप 2026 आधीच पाकिस्तानभोवती नवा वाद निर्माण झाला आहे. बांग्लादेशच्या समर्थनार्थ पाकिस्तान काळी पट्टी बांधून मैदानात उतरू शकतो, अशी चर्चा आहे.

Rahul Shelke

Pakistan Black Armband T20 World Cup: T20 वर्ल्ड कप 2026 ला सुरुवात होण्यास अवघे काही दिवस उरले असताना, स्पर्धेपूर्वीच नवा वाद निर्माण झाला आहे. यावेळी चर्चेच्या केंद्रस्थानी आहे पाकिस्तानी संघ. एकीकडे पाकिस्तानचा संघ वर्ल्ड कप खेळणार की नाही यावर प्रश्न असताना, दुसरीकडे बांग्लादेशच्या मुद्द्यावरून पाकिस्तान आयसीसीसमोर अडचणी निर्माण करू शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे.

जर पाकिस्तान T20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी झाला, तर तो बांग्लादेशच्या समर्थनार्थ काळी पट्टी बांधून मैदानात उतरू शकतो. मात्र, असा निर्णय आयसीसीच्या नियमांच्या चौकटीत बसतो का, हा प्रश्न सध्या क्रीडा विश्वात चर्चेचा विषय ठरत आहे.

आयसीसीचे नियम काय सांगतात?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) नियमांनुसार, कोणताही खेळाडू किंवा संघ पूर्वपरवानगीशिवाय आंतरराष्ट्रीय सामन्यात काळी पट्टी किंवा कोणतंही चिन्ह वापरू शकत नाही. याआधी 2023 मध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू उस्मान ख्वाजा यांनी परवानगी न घेता काळी पट्टी बांधल्यामुळे आयसीसीकडून त्यांना इशारा देण्यात आला होता.

पाकिस्तानवर काय कारवाई होऊ शकते?

जर पाकिस्तानने आयसीसीची परवानगी न घेता काळी पट्टी बांधली, तर संघाला अधिकृत इशारा दिला जाऊ शकतो. हा प्रकार नियमभंग म्हणून मानला जातो. मात्र, नियमभंग झाल्यास खेळाडूंवर सामन्याच्या मानधनाच्या 25 टक्क्यांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. परिस्थिती गंभीर असल्यास आणखी कठोर कारवाई होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.

बांग्लादेश मुद्द्यावरून वाद का?

सुरक्षेच्या कारणांमुळे भारतात खेळण्यास नकार दिल्यानंतर, आयसीसीने बांग्लादेशला T20 वर्ल्ड कप 2026 मधून वगळले आणि त्यांच्या जागी स्कॉटलंडचा समावेश केला. या निर्णयामुळे पाकिस्तान नाराज असून, तो उघडपणे बांग्लादेशच्या बाजूने उभा असल्याचं दिसून येत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संघाची घोषणा केली असली, तरी वर्ल्ड कपमध्ये खेळायचा अंतिम निर्णय सरकार घेणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

काळ्या पट्टीवरुन चर्चा का होत आहे?

क्रीडा विश्वात काळी पट्टी ही सहसा शोक किंवा निषेधाचं प्रतीक मानली जाते. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आयसीसीचे क्लोथिंग आणि इक्विपमेंट नियम खूप कडक आहेत. या नियमांनुसार, खेळाडूंना राजकीय, धार्मिक किंवा वैयक्तिक मेसेज देणारी कोणतीही गोष्ट परवानगीशिवाय करता येत नाही. त्यामुळे पाकिस्तानने असे पाऊल उचलल्यास, वर्ल्ड कपपूर्वीच मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT