आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला विजय मिळवला. Image Instagram
स्पोर्ट्स

T20 World Cup : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानने चिरडले!

अफगाणिस्तानने टी-20 विश्वचषक स्पर्धेतील सर्वात मोठा उलटफेर केला.

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : T20 World Cup : राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान संघाने टी-20 विश्वचषक स्पर्धेतील सर्वात मोठा उलटफेर केला आहे. त्यांनी रविवारी (दि. 23) सुपर 8 फेरीच्या सामन्यात वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियावर 21 धावांनी मात करत पराभवाची धूळ चारली. गुलाबदिन नायबने 4 बळी घेतले. तर नवीन-उल-हकने 3 बळी घेतले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा पहिला विजय ठरला आहे.

  • टी-20 विश्वचषक स्पर्धेत सर्वात मोठा उलटफेर झाला.

  • अफगाणिस्तानने 7 वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा पराभव केला.

  • या ऐतिहासिक विजयाने टी-20 विश्वचषक स्पर्धेत चुरस निर्माण झाली आहे.

किंग्सटाउन येथील अर्नोस वेल मैदानावर नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने रहमानुल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांच्या अर्धशतकांच्या जोरावर निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावून 148 धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली. गुरबाजने 49 चेंडूंचा सामना करत 60 धावा केल्या. त्याने 4 चौकार आणि 4 षटकार मारले. तर झद्रानने 51 धावांची खेळी केली. त्याने 48 चेंडूंचा सामना करताना 6 चौकार मारले. यादरम्यान ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने 3 बळी घेतले. ॲडम झाम्पाने 2 बळी घेतले.

ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानसमोर गुडघे टेकले

149 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाची या सामन्यात खूपच खराब सुरुवात झाली. पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर ट्रॅव्हिस हेड खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. कर्णधार मिचेल मार्श काही विशेष कामगिरी करू शकला नाही आणि केवळ 12 धावा करून नवीन उल हकचा बळी ठरला. सहाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नरच्या रूपाने ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का बसला. पॉवर प्लेअखेर कांगारू संघाची धावसंख्या 3 बाद 33 अशी झाली.

येथून पुढे ग्लेन मॅक्सवेलने एका टोकाकडून डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला ज्यामध्ये त्याला मार्कस स्टॉइनिसची साथ लाभली. या दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी 39 धावांची भागीदारी झाली असताना पण गुलबदिन नायबने स्टॉइनिसची विकेट घेत (17 चेंडूत 11 धावा) ही जोडी फोडली. ही भागीदारी तुटल्याने अफगाणिस्तान संघाला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी मिळाली. पुढे त्यांनी 85 धावांतच कांगारूंचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये पाठवला.

ग्लेन मॅक्सवेलने 41 चेंडूत 59 धावा केल्यानंतर महत्त्वाच्या क्षणी आपली विकेट गमावली. तो पॅव्हेलियनमध्ये परतल्याने अफगाणिस्तान संघाने सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व मिळवले. यानंतर मॅथ्यू वेड (5 धावा), पॅट कमिन्स (3) आणि ॲश्टन ॲगर (2) स्वस्तात माघारी परतले.

सुपर 8 च्या गट 1 मध्ये चुरस

अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचा पराभव झाल्यानंतर सुपर 8 फेरीच्या गट 1 मध्ये चुरस निर्माण झाली आहे. कोणते दोन संघ उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के करतील, हे आता शेवटच्या 2 उरलेल्या सामन्यांद्वारे निश्चित केले जाईल. या गटातील एक सामना भारतीय संघ ऑस्ट्रेलियाशी खेळेल तर दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानचा संघ बांगलादेशशी खेळेल. सध्या या गटातील गुणतालिकेत भारतीय संघ 4 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे, तर ऑस्ट्रेलिया 2 गुणांसह दुस-या स्थानावर आहे, तर अफगाण संघही 2 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर बांगलादेश संघाला 2 सामन्यांनंतरही आपले खाते उघडण्यात यश आलेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT