T20 350 run partnership world record: क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हटलं जातं आणि याच अनिश्चिततेने पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे. T20 इंटरनॅशनलमध्ये असा विक्रम झाला आहे, जो याआधी कधीच झाला नाही. अर्जेंटिनाच्या दोन महिला ओपनर्सने मिळून तब्बल 350 धावांची अविश्वसनीय पार्टनरशिप करत T20 चा नवा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
हा विक्रम 13 ऑक्टोबर 2023 रोजी ब्यूनस आयर्स येथे अर्जेंटिना विरुद्ध चिली महिला संघात झालेल्या सामन्यात झाला आहे. अर्जेंटिनाच्या लुसिया टेलर आणि अल्बर्टीना गलन या दोघींनी मिळून केलेली ही पार्टनरशिप T20 इतिहासातील सर्वात मोठी पार्टनरशिप ठरली आहे. पुरुष आणि महिला क्रिकेट मिळूनसुद्धा यापूर्वी कोणी इतक्या धावा केल्या नव्हत्या.
लुसिया टेलरने फक्त 84 चेंडूंमध्ये 169 धावा ठोकल्या, तर तिची ओपनिंग पार्टनर अल्बर्टीना गलन हिने 84 चेंडूंमध्ये 145 नाबाद धावा केल्या. दोघींनी चौफेर फटकेबाजी करत चिलीच्या गोलंदाजांना अक्षरशः घाम फोडला. लुसियाने 27 चौकार, तर गलनने 23 चौकार मारले. विशेष म्हणजे या विक्रमी धावसंख्येमध्ये एकही षटकार नव्हता.
या धडाकेबाज खेळामुळे अर्जेंटिनाने 20 षटकांत फक्त 1 विकेट गमावून तब्बल 427 धावा केल्या, जो T20 इंटरनॅशनलच्या इतिहासातील सर्वात मोठा स्कोर आहे. पुरुष वा महिला — कोणत्याही आंतरराष्ट्रीय T20 सामन्यात इतक्या धावा कधीच झाल्या नव्हत्या.
चिलीच्या गोलंदाजांची अवस्था इतकी बिकट झाली की एका ओवरची तर इतिहासातच नोंद झाली. चिलीच्या गोलंदाज फ्लोरेन्सिया मार्टिनेज हिने एकाच ओव्हरमध्ये 52 धावा दिल्या, ज्यात 17 नो-बॉलचा समावेश होता. हा T20 इतिहासातील एका ओव्हरमधील सर्वाधिक धावा देण्याचाही विक्रम झाला आहे.
प्रचंड धावसंख्येचा पाठलाग करताना चिली महिला संघ फक्त 63 धावांत ऑलआऊट झाला.
अर्जेंटिनाने हा सामना तब्बल 364 धावांनी जिंकला, जो T20 मधील सर्वात मोठ्या विजयांपैकी एक आहे. या सामन्यात चिलीने 73 धावा एक्स्ट्रा दिल्या, ज्यात 64 नो-बॉल, 8 वाइड आणि 1 बायचा समावेश आहे.
350 धावांची भागीदारी, 427 धावांचा डोंगर, एका ओव्हरमध्ये 52 धावा आणि एकही षटकार नाही, या सामन्यात घडलेला हा विक्रम T20 क्रिकेटच्या इतिहासात कायम स्मरणात राहील. अर्जेंटिनाच्या महिला संघाने केवळ सामना जिंकला नाही, तर क्रिकेटच्या रेकॉर्डलाही हादरा दिला आहे.