Suryakumar Yadav File Photo
स्पोर्ट्स

Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवकडे मुंबईच्या संघाची धुरा; सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी नेतृत्व

शिवम दुबे आणि शार्दुल ठाकूरचाही संघात समावेश; १४ नोव्हेंबरला हैदराबादविरुद्ध पहिला सामना.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: भारताचा टी-ट्वेंटी विश्वचषक विजेता कर्णधार सूर्यकुमार यादवची सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटी ट्रॉफीसाठी मुंबईच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे (एमसीए) ही घोषणा करण्यात आली.

भारताचा माजी टी-ट्वेंटी कर्णधार सूर्यकुमार यादव हा बीसीसीआयच्या सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटी ट्रॉफीसाठी मुंबई संघाचे नेतृत्व करेल.

त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा मोठा अनुभव, नेतृत्वगुण आणि आक्रमक फलंदाजीची क्षमता पाहता त्याच्या कर्णधारपदाखाली मुंबईची सांघिक कामगिरी उंचावेल, असा विश्वास मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) प्रसिद्धीपत्रकात व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबई संघात अष्टपैलू शिवम दुबे आणि शार्दुल ठाकूर यांचाही समावेश आहे. हाताच्या दुखापतीमुळे रणजी ट्रॉफीच्या सुरुवातीच्या टप्प्यात न खेळलेला मध्यमगती गोलंदाज शार्दुल ठाकूर या स्पर्धेद्वारे पुन्हा एकदा स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतत आहे.

सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटी ट्रॉफीमध्ये मुंबई संघ सलामीचा सामना १४ नोव्हेंबर रोजी कोलकाता येथे हैदराबादविरुद्ध खेळणार आहे.

प्रतिनिधित्व करणे ही अभिमानाची गोष्ट

मुंबईचे प्रतिनिधित्व करणे ही नेहमीच अत्यंत अभिमानाची गोष्ट असते. त्यातच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आमच्या प्रतिभावान खेळाडूंच्या गटाचे नेतृत्व करण्याचा मान मिळणे, ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे.

मुंबईला क्रिकेटचा मोठा वारसा आणि विजयाची संस्कृती लाभली आहे, आम्ही ती परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न करू, असे सूर्यकुमार म्हणाला.आमच्या संघात अनुभवी आणि काही अत्यंत आश्वासक तरुण अशा खेळाडूंचा सुरेख समन्वय साधण्यात आला आहे.

संपूर्ण संघ एकजुटीने, पूर्ण ताकदीनिशी आणि जिद्दीने प्रत्येक सामना खेळेल. सर्वोत्तम कामगिरी करून विजेतेपद पटकावण्याचे आमचे लक्ष्य असेल, असे मुंबईच्या कर्णधाराने पुढे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT