Suryakumar Yadav On ODI Captaincy :
भारतीय संघाचा टी २० कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं नुकतेच आशिया कप २०२५ चं विजेतेपद पटकावलं. दुबईत झालेल्या थरारक अंतिम सामन्यात टीम इंडियानं पाकिस्तानचा पराभव केला होता. सूर्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं २०२४ चा टी २० वर्ल्डकप देखील जिंकला होता. दरम्यान, खेळाडू आणि कर्णधार म्हणून टी २० मध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर आता वनडेमध्ये देखील आपल्याकडं नेतृत्व आलं असतं असं वक्तव्य सूर्यानं केलं आहे.
रोहित शर्मानं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर शुभमन गिलकडं संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. आता त्याला वनडेचा देखील कर्णधार करण्यात आलं आहे. कर्णधार म्हणून शुभमन गिलचा पहिलाच दौरा हा ऑस्ट्रेलियाचा असणार आहे. हा दौरा १९ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे.
दरम्यान, सूर्यकुमार यादवनं एका पॉडकास्ट दरम्यान, तो भारतीय वनडे संघाचा कर्णधार झाला असता असं बोलून दाखवलं. तो म्हणाला, 'आता मी विचार करतोय की जर मी वनडे फॉरमॅटमध्ये चांगलं खेळलो असतो तर जसं आता मी टी २० चा कर्णधार आहे तसा वनडे संघाचा देखील कर्णधार झालो असतो. आता हा मी विचार करतोय. मात्र आधी मी विचार करत नव्हतो. तो फॉरमॅट अजून ३० षटके मोठा आहे.'
सूर्या पुढं म्हणाला, 'चेंडूचा रंग देखील सारखा आहे. जर्सी देखील सारखी आहे. आता मी प्रयत्न करणार, शंभर टक्के हरवणार. माझं स्वप्न तर आहे. ज्यावेळी घरात असतो त्यावेळी आम्ही याचीच चर्चा करत असतो. पत्नीसोबत जर मी वनडे क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली असती तर चित्र वेगळं असतं अशी चर्चा करत असतो. ज्यावेळी रोहित भाई वनडे कॅप्टन्सीतून निवृत्त होईल त्यानंतर कोण संघाचं नेतृत्व करेल. जर मी चांगली कामगिरी करत असतो तर मी देखील एक स्पर्धक असतो. मात्र आता देखील संधी गेलेली नाही.'
सूर्यकुमार यादव हा भारताच्या आगामी वनडे मालिकेत खेळत नाहीये. मात्र तो ऑस्ट्रेलियातील पाच टी २० सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. ही मालिका २९ ऑक्टोबर पासून सुरू होईल. मालिकेतील शेवटचा सामना हा ८ नोव्हेंबर रोजी खेळला जाईल.