Sagar Dhankhar murder case
ज्युनियर कुस्तीपटू सागर धनखड याच्या खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार याचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. त्याला एका आठवड्याच्या आत आत्मसमर्पण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुशील कुमार याच्यावर सागर धनखडचा खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला या वर्षाच्या सुरुवातीला दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.
राज्य सरकार आणि सागर धनखडच्या वडिलांची बाजू मांडणाऱ्या वकील जोशिनी तुली यांनी सांगितले की, आज सुशील कुमारला दिलेला जामीन रद्द करण्यात आला आहे. कारण तो चुकीचा आदेश होता. आम्ही तो आदेश चुकीचा असल्याचा दावा करत त्याला आव्हान दिले होते. कायद्यानुसार तो योग्य नव्हता. कारण सुशील कुमारला अंतरिम जामीन मिळताच त्याने साक्षीदारांवर दबाव टाकून त्यांना आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न केला. या खटल्यात अद्याप अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवायचे बाकी आहे.
सुशील कुमारवर खून, दंगल, बेकायदेशीर जमाव आणि गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप आहे. मालमत्तेच्या वादातून सागर धनखड याचा खून करण्यात आला होता. सुशील कुमार आणि त्याच्या साथीदारांनी ४ मे २०२१ रोजीच्या मध्यरात्री दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमच्या पार्किंगमध्ये सागर धनखड आणि त्याचा मित्र सोनू आणि इतर तिघांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात सागर धनखडचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सुशील कुमार सुमारे दोन आठवडे फरार होता. त्यानंतर त्याला पश्चिम दिल्लीतील मुंडका येथून ताब्यात घेण्यात आले होते.
सागर आणि त्याचे मित्र सुशील कुमारचा फ्लॅट सोडत नसल्याच्या कारणावरुन वाद झाला होता. यावरुन सागरवर हल्ला करण्यात आला. दिल्ली पोलिसांनी सादर केलेल्या १७० पानांच्या आरोपपत्रात सुशील कुमारचा मुख्य आरोपी म्हणून उल्लेख केला आहे. तो २ जून २०२१ पासून न्यायालयीन कोठडीत होता. त्यानंतर त्याला ४ मार्च २०२५ रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. या आदेशाला सागर धनखडच्या वडिलांनी आव्हान दिले होते. या अपीलावर सर्वोच्च न्यायालयाने त्याचा जामीन रद्द करत त्याला आठवड्याच्या आत आत्मसमर्पण करण्याचा आदेश दिला आहे.
ऑक्टोबर २०२२ मध्ये, सत्र न्यायालयाने धनखडच्या खून प्रकरणी सुशील कुमार आणि इतर १७ जणांविरुद्ध खुनाचा आरोप निश्चित केला होता.