स्पोर्ट्स

Sunil Gavaskar : ‘तुमचा पैसा भारतीय सैनिकांच्या मृत्यूचे कारण..’, पाक खेळाडूला घेतल्याने गावस्कर काव्या मारनवर भडकले

Sunil Gavaskar Blood Money : ‘निर्णय लवकर बदला अन्यथा..’, हैदराबाद फ्रँचायझीला गंभीर इशारा

रणजित गायकवाड

मुंबई : आयपीएल २०२६ च्या रणधुमाळीपूर्वी सनरायझर्स हैदराबादच्या मालकीण काव्या मारन सध्या क्रिकेट विश्वाच्या निशाण्यावर आहेत. इंग्लंडमधील 'द हंड्रेड' लीगसाठी मारन यांच्या मालकीच्या संघाने पाकिस्तानी फिरकीपटू अबरार अहमदला संघात स्थान दिल्याने नवा वाद उफाळून आला आहे. या निर्णयावर भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले असून, ‘तुमचा पैसा भारतीय सैनिक आणि नागरिकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरेल,’ अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

हैदराबाद फ्रँचायझीला गंभीर इशारा

गावस्कर यांनी हैदराबाद फ्रँचायझीला इशारा दिला आहे की, जर त्यांनी आपला निर्णय बदलला नाही, तर आयपीएल २०२६ दरम्यान त्यांना भारतीय चाहत्यांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागू शकते. गावस्कर यांच्या मते, फ्रँचायझी आणि काव्या मारन यांच्यावर होणारी टीका पूर्णपणे रास्त आहे. ७६ वर्षीय गावस्कर यांनी स्पष्ट केले की, अबरार अहमदला दिली जाणारी रक्कम प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भारताच्या विरोधात वापरली जाऊ शकते. यावेळी त्यांनी संघाचे मुख्य प्रशिक्षक डॅनियल व्हिटोरी यांना कदाचित भारत-पाक सीमेवरील राजकीय परिस्थितीची कल्पना नसावी, असे सांगत मालकांनाच या स्थितीसाठी जबाबदार धरले.

पैसा आणि दहशतवादाचा संबंध

'मिड-डे' मधील आपल्या स्तंभात गावस्कर यांनी लिहिले की, ‘नोव्हेंबर २००८ च्या मुंबई हल्ल्यानंतर भारतीय फ्रँचायझी मालकांनी पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये पूर्णपणे डावलले आहे. पाकिस्तानी खेळाडूंना जे मानधन दिले जाते, त्यातून ते खेळाडू आपल्या सरकारला आयकर देतात. याच पैशातून शस्त्रे आणि दारूगोळा खरेदी केला जातो, जो शेवटी भारतीय सैनिक आणि निष्पाप नागरिकांच्या जीवावर उठतो. ही जाणीव उशिरा का होईना पण झाल्यामुळेच भारतीय संस्था आता पाकिस्तानी कलाकार किंवा खेळाडूंना आपल्या ताफ्यात सामील करून घेण्यास कचरत आहेत.’

निर्णय बदलण्याचे आवाहन

गावस्कर यांनी पुढे नमूद केले की, ‘पैसे देणारी संस्था भारतीय असो किंवा तिची परदेशी उपकंपनी, जर मालक भारतीय असेल तर तो भारतीयांच्या नुकसानीलाच हातभार लावत आहे. एखादी लीग जिंकणे हे भारतीय लोकांच्या प्राणापेक्षा महत्त्वाचे आहे का?’ असा जळजळीत सवाल त्यांनी उपस्थित केला. डॅनियल व्हिटोरी यांना ही बाब समजली नसेल, पण मालकांनी या कराराला नकार द्यायला हवा होता, असेही त्यांनी ठामपणे मांडले.

मैदानावर विरोधाची शक्यता

गावस्कर यांच्या मते, आयपीएल २०२६ मध्ये हैदराबादचा संघ जिथे कुठे खेळेल; मग ते त्यांचे घरचे मैदान असो किंवा परकी... तिथे भारतीय चाहते या खरेदीचा जोरदार निषेध करतील. इतकेच नव्हे तर, संघात दिग्गज फलंदाज असूनही चाहते स्टेडियमकडे पाठ फिरवून आपली नाराजी व्यक्त करू शकतात, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT