Sunil Gavaskar slams DLS
पर्थ : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वन-डे मालिकेतील पहिला सामना रविवारी (दि.२०) पर्थमध्ये झाला; पण पावसामुळे सामना तब्बल चारवेळा थांबवावा लागला. अखेर २६ षटकांचा सामना करण्याचा निर्णय घेण्यात आला. भारताने २६ षटकांमध्ये ९ गडी गमावत १३६ धावा केल्या; परंतु डकवर्थ-लुईस पद्धतीनुसार, ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १३१ धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले. कर्णधार मिशेल मार्शच्या शानदार खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने २१.१ षटकांत तीन बाद १३१ धावा करून सामना जिंकला. या सामन्यानंतर भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी डकवर्थ-लुईस प्रणाली (DLS) वर संताप व्यक्त केला. तसेच बीसीसीआय देशातंर्गत क्रिकेट स्पर्धामध्ये वापरत असलेल्या VJD प्रमालीचे समर्थनही त्यांनी केले.
भारताच्या पराभवानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना गावस्कर म्हणाले, "माझ्या मते फार कमी लोकांना (सध्या वापरत असणारी DLS प्रणाली पूर्णपणे समजली आहे; पण ती खूप काळापासून वापरात आहे," असे स्पष्ट करत गावस्कर यांनी व्हीजेडी (VJD) पद्धतीचा उल्लेख केला. ते म्हणाले व्हीजेडी एका भारतीयाने विकसित केलेली प्रणाली आहे. ही प्रणाली मला खूप चांगली वाटायची कारण ती दोन्ही संघांसाठी गोष्टी समान संधी निर्माण करते. बीसीसीआय देशांतर्गत क्रिकेटमध्ये व्हीजेडी पद्धत वापरत असे; पण आता स्थिती काय आहे याची मला खात्री नाही.
पावसामुळे सामन्यात व्यत्यय आल्यास लक्ष्य निश्चित करण्याच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्याची गरज गावसकरांनी बोलून दाखवली. "कदाचित ही अशी गोष्ट आहे, ज्याकडे त्यांनी (बीसीसीआयने) लक्ष देण्याची गरज आहे आणि त्यांनी पुढाकार घेऊन हे सुनिश्चित केले पाहिजे की, जेव्हा पावसाने खेळ थांबतो, तेव्हा दोन्ही संघांना असे वाटले पाहिजे की त्यांना दिलेले लक्ष्य अधिक निष्पक्ष असेल," असे आवाहन त्यांनी केले.
गावस्कर यांनी पुढील दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली चांगली कामगिरी करतील अशी आशाही व्यक्त केली. रोहित आणि कोहली २२३ दिवसांनंतर भारतासाठी खेळले, परंतु कोणताही फलंदाज प्रभावित करू शकला नाही. रोहित फक्त आठ धावा करू शकला, तर कोहली शून्यावर बाद झाला. गावस्कर म्हणाले, "भारत हा एक खूप चांगला संघ आहे. भारताने सुमारे चार-पाच महिन्यांपूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने पुढील दोन सामन्यांमध्ये मोठी धावसंख्या केली तर आश्चर्यचकित होऊ नका. ते बऱ्याच काळानंतर परत येत आहेत, म्हणून ते जितके जास्त खेळतील आणि नेटमध्ये सराव करतील, तसेच राखीव गोलंदाजांकडून चांगले थ्रोडाऊन करतील, तितके ते पुन्हा धावा करू लागतील. एकदा त्यांनी धावा करायला सुरुवात केली की, भारताचा एकूण धावसंख्या ३००-३२० पेक्षा जास्त होईल, असेही गावस्कर यांनी सांगितले.
बीसीसीआयची व्हीजेडी (VJD) प्रणाली म्हणजे मर्यादित षटकांच्या विशेषत: एकदिवसीय (ODI) आणि टी-२० (T20) सामन्यांमध्ये, पाऊस किंवा इतर कारणांमुळे खेळात व्यत्यय आल्यास, दुसऱ्या डावात खेळणाऱ्या संघासाठी सुधारित लक्ष्य (Revised Target Score) निश्चित करण्याची एक पद्धत आहे. या पद्धतीचा शोध केरळमधील भारतीय अभियंते व्ही. जयदेवन (V. Jayadevan) यांनी लावला यामुळे याला याला 'जयदेवन प्रणाली' किंवा 'व्हीजेडी मेथड' म्हणतात.ही प्रणाली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या डकवर्थ-लुईस (DLS ) पद्धतीला पर्याय म्हणून विकसित करण्यात आली. पावसाने बाधित झालेल्या सामन्यांमध्ये दोन्ही संघांना लक्ष्य पूर्ण करण्यासाठी योग्य आणि निष्पक्ष संधी मिळावी, हा तिचा मुख्य उद्देश आहे.भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ही प्रणाली आपल्या देशांतर्गत (Domestic) क्रिकेट स्पर्धा विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) वापरते. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणि आयपीएलमध्ये (IPL) मात्र DLS पद्धत वापरली जाते. VJD पद्धत धावा काढण्याच्या आलेखावर आधारित आहे. हा आलेख कोणत्याही व्यत्ययाशिवाय, संघ संपूर्ण षटके खेळत असताना, वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये धावा कशा करतात हे दर्शवतो. तसेच सामन्यात पावसामुळे व्यत्यय आल्यासउर्वरित षटकांमध्ये लक्ष्य गाठण्यासाठी दुसऱ्या संघाने धावा कशा वाढवायला हव्यात हे दर्शवतो. या पद्धतीत संपूर्ण डावाला पॉवरप्ले, मधली षटके आणि स्लॉग ओव्हर्स)मध्ये विभागले जाते. तसेच प्रत्येक टप्प्यात धावा काढण्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीचा विचार केला जातो. व्हीजेडी पद्धत DLS पेक्षा जास्त चांगली मानली जाते कारण ती सामन्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांतील धावा काढण्याच्या चढ-उतारांवर आधारित आहे.