पुढारी ऑनलाईन डेस्क : न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय क्रिकेट संघाला नामुष्कीजक पराभवाला सामोरे जावे लागले. टीम इंडियाचा मायदेशात झालेला 'व्हाईट वॉश; चाहत्यांसह दिग्गज क्रिकेटपटूंच्याही जिव्हारी लागला. संघातील दिग्गज खेळाडूंच्या हाराकिरीवर आता सवालही उपस्थित केले जात आहेत. एकेकाळी जगभरातील दिग्गज फिरकीपटूंना जेरीस आणणार्या फलंदाजांचा संघ अशी भारतीय क्रिकेट संघाची ओळख होती. मात्र न्यूझीलंड विरुद्ध कसोटी मालिकेत फलंदाजांची कामगिरी ऑस्ट्रेलियाच्या दौर्यापूर्वी संघाची चिंता वाढवणारी ठरली आहे. भारतीय फलंदाजांची फिरकीपटूंसमोरील निराशाजनक कामगिरीचे कारण भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी सांगितले आहे.
सुनील गावस्कर यांनी फिरकी खेळताना भारतीय खेळाडूंच्या फलंदाजीच्या तंत्रातील त्रुटीवर बोट ठेवले. 'इंडिया टूडे'शी बोलताना सुनील गावस्कर म्हणाले की, पांढर्या चेंडूने खेळण्यास प्रारंभ झाला तेव्हापासून फलंदाजांना फटकेबाजीचा मोह आवरता आला नाही. मागील काही काळापासून वनडे आणि टी-20 क्रिकेट फॉरमॅटमध्ये भारतीय क्रिकेटपटू अधिक खेळतात. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये फटकेबाजीचे तंत्र चालत नाही. जेव्हा खेळपट्टी गोलंदाजांना साथ देते तेव्हा तुम्हाला बॅटचा वेग नियंत्रित करणे आवश्यक आहे. बॅटचा वेग लक्षात येतो ज्यावर नियंत्रण ठेवावे लागते. भारतीय फलंदाज फिरकीपटूंना सामोरे जाताना स्पॉट हॅण्डने खेळले नाहीत. त्यामध्ये ते कमी पडले, असे सुनील गावस्कर यांनी म्हटलं आहे.
भारतीय फलंदाजांनी २०२१ पासून घरच्या मैदानावर फिरकीपटूंविरुद्ध संघर्ष केला आहे. टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीची २०१९ पूर्वी घरच्या मैदानावर धावांची सरासरी 68.42 होती. २०२१ पासून ही सरासरी 29.92 वर घसरली आहे. कर्णधार रोहित शर्मा (88.33 ते 35.58) आणि केएल राहुल (44.25 ते 29.33) यांच्यााही धावांमध्ये झालेली घसरण चिंताजनक ठरली आहे.