Sunil Gavaskar on Ind vs NZ 1st T20 match
नागपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने दिमाखदार विजयाची नोंद केली. या सामन्यात सलामीवीर अभिषेक शर्माने केलेल्या झंझावाती खेळीने न्यूझीलंड संघ बॅकफूटवर फेकला गेला. मात्र विजयानंतर भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी एका खेळाडूला संघाचे जादूगार असे संबोधले.
बुधवारी विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद २३८ धावांचा डोंगर उभा केला. सलामीवीर अभिषेक शर्माने अवघ्या ३५ चेंडूंत ८४ धावांची तडाखेबंद खेळी केली. त्याला कर्णधार सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या आणि रिंकू सिंग यांनी मोलाची साथ दिली. प्रत्युत्तरात न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली, मात्र ग्लेन फिलिप्स आणि मार्क चॅपमन यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. अखेर भारतीय गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीमुळे भारताने ४८ धावांनी सामना जिंकला.
वरुण चक्रवर्तीने या सामन्यात ४ षटकांत ३७ धावा देऊन २ बळी टिपले. त्याच्या कामगिरीवर भाष्य करताना गावस्कर 'जिओस्टार'वर म्हणाले, "वरुण सुरुवातीला थोडा लयीत नसल्यासारखा वाटला; पण फलंदाज जेव्हा आक्रमक पवित्र्यात असतात तेव्हा हे स्वाभाविक आहे. महत्त्वाचे म्हणजे त्याची देहबोलीसकारात्मक होती. अनेकदा धावा खर्च झाल्यावर तो खचल्यासारखा वाटतो, पण यावेळी तसे दिसले नाही. फलंदाजानी षटकार ठोकल्यानंतरही तो आत्मविश्वासाने गोलंदाजी करत राहिला. हे शुभसंकेत आहेत. तो एक 'जादूगार' आहे यात शंका नाही, तो अप्रतिम गोलंदाजी करतो. ५० षटकांच्या सामन्यातही तो महागडा ठरू शकतो, पण 'पुढच्या ओव्हरमध्ये मी विकेट घेणारच' हा आत्मविश्वास त्याने राखायला हवा, असा सल्लाही गावस्कर यांनी दिला.
भारतीय संघाच्या अष्टपैलू कामगिरीवर समाधान व्यक्त करताना गावस्कर म्हणाले की, नवीन वर्षाची आणि नवीन मोहिमेची सुरुवात विजयाने होणे नेहमीच चांगले असते. २३८ धावा उभारणे आणि त्यानंतर प्रतिस्पर्धी संघाला रोखणे ही कौतुकास्पद बाब आहे. काही झेल सुटले असले तरी, एकंदरीत भारताची कामगिरी उत्कृष्ट होती, विश्वचषकाच्या दृष्टीने उत्तम सुरुवात आहे, असेही गावस्कर यांनी नमूद केले.