Pudhari News
स्पोर्ट्स

Sunil Gavaskar : "टीम इंडियाने त्‍याचा पर्याय शोधणे...." : हार्दिक पांड्याबाबत सुनील गावस्‍कर नेमकं काय म्‍हणाले?

Sunil Gavaskar on Hardik Pandya replacement : नमन धीरसारख्या नवोदितांना संधी देण्याची गरज

पुढारी वृत्तसेवा

Sunil Gavaskar on Hardik Pandya replacement : "फलंदाजी अधिक भक्कम करण्याच्या प्रयत्नात भारत आपली गोलंदाजी कमकुवत करून बसण्याची शक्यता आहे. हार्दिक पांड्याला पर्याय शोधणे ही काही सोपी गोष्ट नाही. थेट पर्याय शोधण्याऐवजी, भारताने अशा खेळाडूंवर लक्ष केंद्रित केले पाहिजे जे एकापेक्षा जास्त भूमिका बजावू शकतात. पाचव्या आणि सहाव्या गोलंदाजाची जबाबदारी अशा अष्टपैलू खेळाडूंवर असावी जे फलंदाजीमध्येही योगदान देऊ शकतात," असा महत्त्‍वपूर्ण सल्‍ला माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी टीम इंडियाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांना दिला आहे.

हार्दिकची जागा दुसरा कोणताही खेळाडू घेऊ शकत नाही

वेस्ट इंडिजविरुद्धचा पाचवा आणि निर्णायक टी-२० सामना शनिवारी पावसामुळे रद्द झाला. पाच सामन्यांची ही मालिका २-२ अशी बरोबरीत सुटल्यानंतर 'जियोस्टार'वर बोलताना गावस्कर म्‍हणाले की, "हार्दिक पंड्यासारख्या खेळाडूचा पर्याय शोधण्याच्या नादात आपण निष्कारण वेळ घालवत आहोत. हार्दिकची जागा दुसरा कोणताही खेळाडू घेऊ शकत नाही. त्यामुळे त्याच्या क्षमतेचा खेळाडू मिळत नसेल, तर संघाला वेगळे पर्याय देऊन संतुलित करू शकेल अशा खेळाडूला संधी द्या," असा थेट सल्ला महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी भारतीय संघ व्यवस्थापनाला दिला आहे.

नमन धीरकडून चांगल्या कामगिरीची आशा

हार्दिकला पर्याय शोधण्याऐवजी नमन धीरसारख्या नवोदितांना संधी देण्याची गरज गावस्कर यांनी स्‍पष्‍ट केले. नमन धीर सध्या हेच काम करत आहे. तो अत्यंत प्रभावीपणे गोलंदाजीची षटके टाकतोय आणि फलंदाजीतही चमकदार कामगिरी करतोय." पावसामुळे केवळ ७.४ षटकांचा खेळ झालेल्या या सामन्यात नमन धीरने अवघ्या ६ चेंडूंत नाबाद २४ धावांची वादळी खेळी केली होती.

फलंदाजी भक्‍कम करताना गोलंदाजी कमकुवत करू नका

" वेस्‍ट इंडिज मालिकेतून भारताने एक धडा घेतला पाहिजे. संघात किमान चार प्रमुख (स्पेशालिस्ट) गोलंदाज असायलाच हवेत. पाचवा आणि सहावा पर्याय म्हणून अष्टपैलू खेळाडूंचा वापर करता येईल. तो गोलंदाजीबरोबरच फलंदाजीतही योगदान देऊ शकतील. नमन धीर मूळचा फलंदाज असला तरी २-३ षटके टाकू शकतो, अक्षर पटेल चार षटके पूर्ण करण्याची क्षमता ठेवतो. पण आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाजी वाढवण्याच्या नादात आपण गोलंदाजी कमकुवत करत आहोत, आणि हीच गोष्ट पराभवाला कारणीभूत ठरते," असा इशाराही गावस्‍करांनी दिला. सामना पावसामुळे रद्द झाल्याने भारतीय गोलंदाजांची लहान षटकांच्या सामन्यात कशी परीक्षा होते, हे पाहण्याची संधी हुकल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

स्पिनर्सचा आत्मविश्वास जपणे गरजेचे

फिरकी (स्‍पिनर्स) गोलंदाजांच्या निवडीबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, "संघात फिरकी गोलंदाजांचे पर्याय निश्चित करून त्यांना सातत्याने पाठिंबा देणे गरजेचे आहे. खेळाडू अंतिम ११ मध्ये असोत वा नसोत, पण ते संघाचा महत्त्वाचा भाग आहेत. विशेषतः फिरकीपटूंना विश्वासात घेणे आवश्यक आहे, कारण टी-२० सारख्या लहान फॉरमॅटमध्ये गोलंदाजांचा आत्मविश्वास खूप लवकर कमी होतो, असेही गावस्‍करांनी स्‍पष्‍ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT