चेन्नई : भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार, स्टार स्ट्रायकर सुनील छेत्री याने भारतीय संघ एएफसी आशियाई कप 2027 च्या पात्रता फेरीतून बाहेर पडल्यानंतर आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपल्याची घोषणा केली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत छेत्रीने भारत एशियन कप 2027 साठी पात्र न ठरल्यामुळे आपण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम दिल्याचे स्पष्ट केले.
आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून जरी निवृत्ती स्वीकारली असली, तरी छेत्री अजूनही क्लब फुटबॉलमध्ये खेळत राहणार आहे. त्याने नुकताच बंगळूर एफसी सोबत नवीन करार केला आहे.
41 वर्षीय छेत्री हा भारताकडून सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे. त्याने 157 आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यांत 95 गोल केले आहेत. त्याने यापूर्वी जून 2024 मध्ये कोलकाताच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर निरोप समारंभाच्या सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर मात्र भारतीय संघाचे तत्कालीन मुख्य प्रशिक्षक मनोलो मार्केझ यांच्या विनंतीवरून तो एएफसी आशियाई कप 2027 च्या पात्रता सामन्यांसाठी पुन्हा संघात परतला होता.
राष्ट्रीय संघाच्या जर्सीतील छेत्रीचा शेवटचा सामना 14 ऑक्टोबर रोजी सिंगापूरविरुद्ध होता, ज्यात भारताचा 1-2 असा पराभव झाला. पुनरागमनानंतर छेत्रीने भारतासाठी सहा सामने खेळले, ज्यात तो केवळ एकदाच गोल करू शकला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत छेत्रीने भारत एशियन कप 2027 साठी पात्र न ठरल्यामुळे मी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम दिला असल्याचे स्पष्ट केले.