Steve Bucknor Sachin Tendulkar LBW Mistake Pudhari
स्पोर्ट्स

Sachin Tendulkar: सचिनला चुकूनं आऊट दिलं होतं; स्टीव्ह बकनर यांनी 22 वर्षांनंतर दिली कबुली, नेमकं काय घडलं होतं? VIDEO

Steve Bucknor Sachin Tendulkar: ब्रिस्बेन कसोटी सामन्यात सचिन तेंडुलकरला चुकून LBW आऊट देणारे माजी पंच स्टीव्ह बकनर यांनी तब्बल 22 वर्षांनंतर आपली चूक मान्य केली आहे. त्या निर्णयामुळे सचिन अवघ्या 3 धावांवर बाद झाला होता.

Rahul Shelke

Steve Bucknor Sachin Tendulkar LBW Mistake: क्रिकेटच्या इतिहासात काही निर्णय असे असतात, जे वर्षानुवर्षे चाहत्यांच्या मनात कायम राहतात. भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडिजचे माजी पंच स्टीव्ह बकनर यांच्याशी संबंधित 2003-04 मधील एक प्रसंग आजही चर्चेत आहे. तब्बल 22 वर्षांनंतर आता बकनर यांनी त्या वादग्रस्त निर्णयाबद्दल खंत व्यक्त केली आहे.

ब्रिस्बेन येथे झालेल्या भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यात हा प्रसंग घडला होता. त्या वेळी आपल्या कारकिर्दीच्या सर्वोच्च शिखरावर असलेला सचिन फलंदाजी करत होता. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज जेसन गिलेस्पीने टाकलेला चेंडू सचिनच्या पॅडला लागला आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी जोरदार अपील केले. अनुभवी पंच असलेल्या बकनर यांनी क्षणाचाही विलंब न करता बोट वर केलं. सचिन अवघ्या तीन धावांवर बाद झाला आणि भारतीय चाहत्यांना मोठा धक्का बसला.

नंतरच्या रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होतं की चेंडू स्टम्पच्या वरून जात होता. त्या वेळी समालोचक टोनी ग्रेग यांनीही थेट प्रक्षेपणात हा निर्णय भयानक असल्याचं म्हटलं होतं. मैदानावर सचिनच्या चेहऱ्यावरचे भाव चाहत्यांना अजूनही आठवतात.

आता 79 वर्षीय बकनर यांनी एका मुलाखतीत कबूल केलं की तो निर्णय चुकीचा होता. “सचिन तेंडुलकरला एल्बीडब्ल्यू देणं ही चूक होती. लोक आजही त्याबद्दल बोलतात. आयुष्यात चुका होतात. मी ती चूक मान्य केली आहे,” असं त्यांनी सांगितलं.

त्या काळात DRS (Decision Review System) नव्हतं. त्यामुळे पंचांचा निर्णय अंतिम मानला जायचा. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात असा निर्णय झाला नसता. पण त्या काळात सचिन आऊट झाला आणि तो प्रसंग भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात कायमचा कोरला गेला.

स्टिव्ह बकनर हे त्यांच्या काळातील अत्यंत अनुभवी पंच मानले जात होते. त्यांनी 120 हून अधिक कसोटी सामने आणि अनेक विश्वचषक स्पर्धांमध्ये पंचाच काम केलं आहे. तरीही सचिनविरुद्ध दिलेल्या काही निर्णयांमुळे ते भारतीय चाहत्यांच्या टीकेचे धनी ठरले.

22 वर्षांनंतर त्यांनी दिलेली कबुली अनेकांसाठी उशिरा का होईना, पण समाधान देणारी आहे. क्रिकेटमध्ये चुका होतात, पण त्या स्वीकारण्याचं धैर्य फार थोड्यांकडे असतं. बकनर यांच्या या विधानामुळे क्रिकेटच्या इतिहासातील एक वादग्रस्त अध्याय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT