दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या अलंकरण समारंभात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि लष्करप्रमुख उप्रेंद्र द्विवेदी यांच्या हस्ते त्यांना ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. नीरज चोप्रा २६ ऑगस्ट २०१६ रोजी नायब सुभेदार या पदावर भारतीय सैन्यात भरती झाले होते. त्यानंतर, २०२१ मध्ये या खेळाडूला सुभेदार पदावर बढती मिळाली. तर २०२२ मध्ये निरजला सुभेदार मेजर पदावर बढती मिळाली होती.
नीरज हाऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये भारतासाठी दोन वैयक्तिक पदके जिंकणाऱ्या निवडक खेळाडूंमध्ये समाविष्ट आहेत. ॲथलेटिक्समध्ये त्यांच्यापूर्वी नॉर्मन प्रिचर्ड यांनी दोन रौप्य पदके (पुरुषांची २०० मीटर आणि पुरुषांची २०० मीटर अडथळा शर्यत) जिंकली होती. कुस्तीमध्ये सुशील कुमारने एक रौप्य आणि एक कांस्यपदक पटकावले. बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधूने एक रौप्य आणि एक कांस्यपदक आपल्या नावावर केले आहे, तर नेमबाजीमध्ये मनू भाकरने दोन कांस्यपदके जिंकली आहेत.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून नीरजने इतिहास रचला होता. मात्र, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्याला आपल्या सुवर्ण यशाची पुनरावृत्ती करता आली नाही. असे असले तरी निरजने भारतात भालाफेक या खेळाला नवी ओळख मिळवून दिली आहे. जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपसह जगातील अनेक स्पर्धांमध्ये त्याने अव्वल स्थान मिळवले आहे. सध्या तो केवळ भारतातीलच नव्हे, तर जगातील अग्रगण्य भालाफेकपटूंमध्ये गणला जातो. परिणमे त्याच्या यशामुळेच भारतात या खेळाला लोकप्रियता मिळाली आहे.
भारतीय लष्कराने नीरज चोप्रा याला प्रादेशिक सेनेत (Territorial Army) 'लेफ्टनंट कर्नल' या पदाची मानद उपाधी दिली आहे. नीरज याच्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आणि कपिल देव तसेच ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता अभिनव बिंद्रा यांसारख्या खेळाडूंना प्रादेशिक सेनेत मानद उपाधी देण्यात आली आहे. प्रादेशिक सेना भारतीय लष्कराचे राखीव दल आहे. यामध्ये सामील करण्यात येणा-या दिग्गजांना दरवर्षी काही दिवसांचे लष्करी प्रशिक्षण दिले जाते, जेणेकरून गरज पडल्यास देशाच्या रक्षणासाठी त्यांची सेवा घेता यावी.