MS Dhoni CSK Playoffs Pudhari
स्पोर्ट्स

MS Dhoni IPL 2026: धोनीची उणीव कोणालाच भासत नाही... CSK ने फसवणूक केली : भारताच्या माजी कर्णधाराची जोरदार टीका

आयपीएल २०२६ मधील चेन्नई सुपर किंग्सचा प्रवास यंदा कमालीचा निराशाजनक ठरला. संघ प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला असतानाच, आता एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.

मोहन कारंडे

MS Dhoni IPL 2026

चेन्नई: आयपीएल २०२६ मधील चेन्नई सुपर किंग्सचा प्रवास यंदा कमालीचा निराशाजनक ठरला. संघ प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला असतानाच, आता एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. भारताचे माजी कर्णधार आणि माजी मुख्य निवडकर्ते कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी धोनीच्या तंदुरुस्तीबाबत चेन्नईच्या व्यवस्थापनावर जोरदार टीका केली आहे.

"चेन्नई व्यवस्थापनाने संपूर्ण मोसमात महेंद्रसिंह धोनीच्या तंदुरुस्तीबाबत चाहत्यांची दिशाभूल केली," असा गंभीर आरोप श्रीकांत यांनी केला आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध झालेल्या ८९ धावांच्या मानहानीकारक पराभवानंतर त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलवर CSK प्रशासनाचा खरपूस समाचार घेतला.

'धोनी पुढील सामन्यात खेळू शकतो'चा रचला खोटा खेळ

श्रीकांत यांनी चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड, मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग आणि सपोर्ट स्टाफला थेट लक्ष्य केले. धोनी संपूर्ण मोसमात एकही सामना खेळू शकणार नाही हे स्पष्ट असतानाही, तो लवकरच संघात परतेल असे खोटे आशेचे किरण चाहत्यांना का दाखवण्यात आले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

श्रीकांत म्हणाले, "हंगाम सुरू होण्यापूर्वी सांगण्यात आले की धोनीच्या पायाला दुखापत झाली आहे आणि तो लवकरच संघात परतेल. तीच री ओढत फ्लेमिंग आणि ऋतुराज गायकवाड प्रत्येक सामन्याआधी 'धोनी पुढच्या सामन्यात खेळू शकतो' असे सांगत राहिले. इतकेच नाही तर सामन्यापूर्वी धोनीच्या सरावाचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करून तो तंदुरुस्त असल्याचे भासवत चाहत्यांची फसवणूक करण्यात आली."

दुखापतींचे वेगवेगळे बहाणे आणि लपवाछपवी

स्पर्धा सुरू होण्यापूर्वी धोनीच्या पायाच्या स्नायूंना दुखापत झाल्याचे सांगण्यात आले होते. ही दुखापत किरकोळ असेल असा अंदाज होता, मात्र नंतर त्याला 'थाई स्ट्रेन' असल्याचे सांगण्यात आले. सरतेशेवटी सांघिक संतुलनाचे कारण देऊन त्याला विश्रांती दिल्याचा दावा करण्यात आला.

या संपूर्ण गोंधळात चेन्नई व्यवस्थापनाने धोनी पूर्ण हंगामातून बाहेर पडल्याचे कधीही अधिकृतपणे जाहीर केले नाही. धोनी संघासोबत इतर शहरांमधील सामन्यांसाठीही गेला नव्हता. तो थेट चेपॉक स्टेडियमवरील चेन्नईच्या शेवटच्या घरच्या सामन्यात दिसला, जिथे त्याने चाहत्यांचे आभार मानण्यासाठी मैदानाला फेरी मारली. तरीही त्याच्या पुनरागमनाच्या चर्चा थांबल्या नाहीत.

"धोनीचे पर्व आता संपले आहे, सत्य स्वीकारा!"

चेन्नईच्या शेवटच्या साखळी सामन्यात समालोचक ग्रॅमी स्वानने ऋतुराज गायकवाडला धोनीच्या भविष्याबद्दल विचारले असता, ऋतुराजने "तुम्हाला पुढच्या वर्षी समजेल," असे म्हणत गूढ वाढवले. यावर संताप व्यक्त करत श्रीकांत म्हणाले, "हा फसवणुकीचा खेळ आता थांबवा. जर तो संपूर्ण मोसम खेळणार नव्हता, तर ते स्पष्ट सांगायला हवे होते. चाहत्यांची मानसिक तयारी झाली असती. व्यवस्थापन आणि कर्णधाराने प्रामाणिकपणे सत्य सांगायला हवे होते."

पुढे बोलताना श्रीकांत यांनी एक मोठे विधान केले. ते म्हणाले, "प्रामाणिकपणे सांगायचे तर, आता मैदानावर कोणीही धोनीची उणीव भासू देत नाहीये. सामन्यांमध्ये आता कोणी धोनीची मागणी करत नाही. लोक फक्त तो ड्रेसिंग रूममध्ये का नाही, एवढाच विचार करत आहेत. धोनी हा आयपीएलच्या इतिहासातील महान खेळाडू आणि सर्वोत्तम कर्णधार आहे यात शंका नाही, पण आता 'धोनी पर्व' संपले आहे. मग चाहत्यांना अंधारात का ठेवले जात आहे?"

चेन्नईची सलग तिसऱ्या वर्षी निराशा

पाच वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्ससाठी हा मोसम अत्यंत खराब ठरला. १४ सामन्यांत अवघे १२ गुण मिळवून चेन्नईचा संघ गुणतालिकेत तळाच्या चार संघांमध्ये राहिला. विशेष म्हणजे, चेन्नईचा संघ सलग तिसऱ्या वर्षी प्ले-ऑफ गाठण्यात अपयशी ठरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT