India vs Sri Lanka T20I Series
टीम इंडिया विरुद्ध 27 जुलैपासून सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी श्रीलंका क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे.  File Photo
स्पोर्ट्स

IND vs SL : भारताविरुद्धच्या T20 मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर! चरित असलंका कर्णधार

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs SL T20 Series : टीम इंडिया विरुद्ध 27 जुलैपासून सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी श्रीलंका क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने चारिथ असलंका याची कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. त्याच्या नेतृत्वाखालील 16 सदस्यीय संघात दिनेश चंडिमल, कुसल जनित परेरा यांसारख्या इतर वरिष्ठ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. दुसरीकडे, अँजेलो मॅथ्यूज आणि धनंजय डी सिल्वा यांना वगळण्यात आले आहे.

या मालिकेआधी वानिंदू हसरंगाने संघाचे कर्णधारपद सोडले होते. त्यामुळे या मालिकेसाठी श्रीलंकेने नवा टी-20 कर्णधार म्हणून अष्टपैलू चरिथ असलंका याची निवड केली आहे. नुकत्याच झालेल्या टी-20 विश्वचषक श्रीलंकन संघाची कामगिरी निराशाजनक झाली होती. परिणामी हसरंगाने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत आता असलंकावर मोठी जबाबदारी असणार आहे.

बोर्डाने संघात फारसे बदल केलेले नाहीत, मात्र अनुभवी आणि युवा खेळाडूंना संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी खेळाडू अँजेलो मॅथ्यूजला स्थान देण्यात आलेले नाही. यामागचे काय कारण आहे हे स्पष्ट झालेले नाही.

असलंकाच्या नेतृत्वाखाली जाफना किंग्जने पटकावले लंका प्रीमियर लीगचे विजेतेपद

चरिथ असलंका 2024 च्या टी20 विश्वचषकात संघाचा उपकर्णधार होता. वानिंदू हसरंगाने कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतरच तो संघाचा नवा कर्णधार होऊ शकतो, अशी अपेक्षा होती. त्यातच असलंकाच्या नेतृत्वाखाली जाफना किंग्जने नुकतेच लंका प्रीमियर लीग (LPL)चे विजेतेपद पटकावले. त्यानंतर तो कर्णधार होण्याची शक्यता अधिक वाढली होती. अखेर नव्या संघाची घोषणा करताना श्रीलंका क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आणि असलंकाकडे नेतृत्व सोपवले.

भारताविरुद्ध टी-20 मालिकेसाठी श्रीलंकेचा 16 सदस्यीय संघ

चरिथ असलंका (कर्णधार), पथुम निसंका, कुसल परेरा, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चांडीमल, कामिंदु मेंडिस, दासुन शनाका, वानिंदु हसारंगा, डुनिथ वेलालगे, महीश तीक्ष्णा, चामिंदु विक्रमसिंघे, मथीशा पथिराना, नुवान तुषारा, दुष्मंथा चमीरा, बिनुरा फर्नांडो.

SCROLL FOR NEXT