South Africa won by 9 wkts
टी-20 विश्वचषकातील पहिल्या उपांत्य सामन्यात द. आफ्रिकेने अफगाणिस्तानचा पराभव करत फायनल फेरी गाठली South Africa Celebration
स्पोर्ट्स

अफगाणिस्तान स्पर्धेतून आऊट; द. आफ्रिका फायनलमध्ये

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : टी-20 विश्वचषक 2024 चा पहिला उपांत्य सामना नऊ गडी राखून जिंकून दक्षिण आफ्रिकेने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ब्रायन लारा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 11.5 षटकात 10 गडी गमावून 56 धावा केल्या. या धावसंख्येवर ऑलआऊट होणे ही टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील कोणत्याही संघाची सर्वात कमी धावसंख्या आहे. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने 8.5 षटकांत 1 गडी बाद 60 धावा केल्या आणि चालू स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला.

मार्कराम-हेन्ड्रिक्सची आश्वासक खेळी

अफगाणिस्तानने दिलेल्या 57 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का फजलहक फारुकी याने पाच धावांवर दिला. त्याने क्विंटन डी कॉकला बोल्ड केले. यानंतर रीझा हेंड्रिक्स आणि एडन मार्कराम डावाची धुरा स्वीकारली. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी 55 धावांची नाबाद भागीदारी केली. यामध्ये सलामीवीर हेंड्रिक्सने 29 आणि कर्णधार मार्करामने 23 धावा केल्या. त्यांच्या या आश्वासक खेळीच्या जोरावर द. आफ्रिकेने सामन्यात सहज विजय मिळवला.

प्रथमच गाठली टी-20 विश्वचषकाची अंतिम फेरी

दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच टी-20 विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे. यापूर्वी 2014 सालच्या विश्वचषकात ते उपांत्य फेरीतूनच बाहेर पडले होते.

पत्त्याप्रमाणे कोसळला अफगाणिस्तानचा डाव

टी-20 विश्वचषकातील पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेसमोर केवळ 57 धावांचे लक्ष्य ठेवले. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. संपूर्ण संघ आफ्रिकेच्या गोलंदाजांनी केलेल्या अचुक माऱ्यापुढे पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. अजमतुल्ला उमरझाईने संघाकडून सर्वाधिक 10 धावा केल्या.

उर्वरित एकाही फलंदाजाला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. पहिल्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेने भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन केले. त्यांच्याकडून मार्को जॅनसेन आणि तबरेझ शम्सी यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. तर, कागिसो रबाडा आणि ॲनरिक नोर्टजे यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

प्रॉव्हिडन्स स्टेडियमवर रंगणार भारत-इंग्लंड सामना

ICC टी-20 विश्‍वचषक स्‍पर्धा २०२४ मध्‍ये दुसरा उपांत्‍य (सेमी फायनल) सामना गुरुवार, २७ जूनला भारत आणि इंग्‍लंड यांच्‍यात होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री आठ वाजल्‍यापासून गयाना येथील प्रॉव्हिडन्स स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल.

SCROLL FOR NEXT