Sourav Ganguly on Greg Chappell : माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ग्रेग चॅपेल यांच्यासोबत असणार्या मतभेदावर भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने पुन्हा एकदा भाष्य केले आहे. पाकिस्तानचे माजी कर्णधार इम्रान खान सध्या कोठडीत असून त्यांची तब्येत खालावली आहे. त्यांच्या कल्याणासाठी पाकिस्तान सरकारला एक याचिका सादर करण्यात येणार होती, ज्यावर स्वाक्षरी करण्यासाठी चॅपेल यांनी गांगुलीशी संपर्क साधला होता. मात्र, भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांच्यासोबत असलेले जुने ताणलेले संबंध लक्षात घेता, आपण त्यांच्या या विनंतीला प्रतिसाद दिला नाही, अशी कबुली गांगुलीने दिली आहे. दरम्यान, १९९२ च्या विश्वविजेत्या पाकिस्तान संघाचे कर्णधार राहिलेल्या आणि २०२३ पासून कोठडीत असलेल्या इम्रान खान यांच्यासाठी सुनील गावस्कर, कपिल देव यांच्यासह जगातील इतर १२ दिग्गज क्रिकेटपटूंनी या याचिकेवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
२००५ मध्ये चॅपेल यांची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. तत्कालीन कर्णधार सौरव गांगुलीनेच या माजी ऑस्ट्रेलियन कर्णधाराच्या नियुक्तीला पाठिंबा दिला होता. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच त्यांच्यातील संबंध कमालीचे बिघडले. चॅपेल यांनी बीसीसीआयला (BCCI) पत्र लिहून गांगुली मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या कर्णधारपदासाठी तंदुरुस्त नसल्याचा अहवाल दिला होता. यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता.त्यानंतर गांगुलीला कर्णधारपदावरून हटवून राहुल द्रविडकडे संघाची कमान सोपवण्यात आली होती, तसेच गांगुलीला संघातूनही वगळण्यात आले होते. चॅपेल यांचा कार्यकाळही फार काळ टिकला नाही; २००७ च्या विश्वचषकात भारतीय संघ साखळी फेरीतच बाहेर पडल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
'AddaGBPodcast' वर बोलताना सौरव गांगुली म्हणाला, " मला चॅपेल यांनी संपर्क केला होता), पण मी त्यांना उत्तर देत नाही. जे लोक प्रामाणिक नसतात, त्यांना मी उत्तर देणे टाळतो. तुमची मते वेगवेगळी असू शकतात. एखादा खेळाडू चांगला नाही किंवा सरासरी दर्जाचा आहे, असे तुम्हाला वाटू शकते; पण समस्या सोडवण्यासाठी जे लोक चुकीचा मार्ग निवडतात, ते मला अजिबात आवडत नाहीत. त्याऐवजी 'तू तितकासा चांगला खेळाडू नाहीस' हे माझ्या तोंडावर सांगणारे लोक मला जास्त आवडतात."
या मुलाखतीत गांगुलीने आणखी एक खळबळजनक खुलासा केला. २०११ मध्ये चॅपेल यांनी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) चे मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी गांगुलीशी संपर्क साधला होता. २०११ मध्येही त्यांनी मला एक मेल केला होता. तेव्हा मी (आयपीएलमध्ये) कर्णधार होतो. त्यांना केकेआरचे प्रशिक्षक व्हायचे होते आणि मी कर्णधार राहावे अशी त्यांची इच्छा होती. ते (समजदारपणाचे) खूपच छान झाले असते (गांगुलीने उपरोधाने म्हटले). या लोकांना बहुदा असे वाटत असावे की हा 'दादा' मूर्ख आहे. पण मी एकदा मूर्ख बनू शकतो, दुसऱ्यांदा नाही!"