Sourav Ganguly Biopic Pudhari
स्पोर्ट्स

Sourav Ganguly Biopic: 'दादा'च्या भूमिकेत राजकुमार राव; सौरव गांगुलीच्या बायोपिकचा फर्स्ट लुक समोर, रिलीज डेटही जाहीर

Sourav Ganguly Biopic: सौरव गांगुली यांच्या जीवनावर आधारित 'दादा: द सौरव गांगुली स्टोरी' या चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रदर्शित करण्यात आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Sourav Ganguly Biopic: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्या आयुष्यावर आधारित 'दादा: द सौरव गांगुली स्टोरी' या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा पहिला लुक अखेर समोर आला आहे. विशेष म्हणजे, गांगुली यांच्या वाढदिवसानिमित्त हा फर्स्ट लुक प्रदर्शित करण्यात आला असून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. या चित्रपटात राजकुमार राव सौरव गांगुली यांच्या भूमिकेत झळकणार असून त्याचा लुक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

पोस्टरमध्ये राजकुमार राव यांनी साकारलेला गांगुलींचा ऐतिहासिक अंदाज पाहायला मिळतो. 2002 मध्ये लॉर्ड्स मैदानावर नेटवेस्ट ट्रॉफी जिंकल्यानंतर गांगुलींनी बाल्कनीत टी-शर्ट हवेत फिरवत केलेला जल्लोष भारतीय क्रिकेटमधील सर्वात संस्मरणीय क्षणांपैकी एक मानला जातो. हाच क्षण चित्रपटाच्या फर्स्ट लुकमध्ये पुन्हा जिवंत करण्यात आला आहे.

राजकुमार राव यांनी हा फर्स्ट लुक त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करत सौरव गांगुलींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पोस्टर समोर येताच सोशल मीडियावर चाहत्यांकडून त्याचे जोरदार स्वागत होत आहे.

एका मुलाखतीत राजकुमार राव यांनी सांगितले की, सौरव गांगुली यांची भूमिका साकारणे ही केवळ अभिनयाची संधी नसून त्यांच्या आयुष्यातील एक मोठा सन्मान आहे. गांगुली हे फक्त यशस्वी कर्णधार नाहीत, तर लाखो भारतीयांसाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या संघर्षाची आणि यशाची कहाणी मोठ्या पडद्यावर साकारताना मोठी जबाबदारी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

'दादा: द सौरव गांगुली स्टोरी' हा चित्रपट 14 मे रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या घोषणेनंतर आता प्रेक्षकांना त्याच्या टीझर आणि ट्रेलरची उत्सुकता लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT