Maharashtra Rain Live Update: राज्यात पावसाचा जोर कायम; पुढील 6 दिवस महत्त्वाचे, हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

Maharashtra Rain Live Update: महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे मुंबई, पुणे, नाशिक, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Maharashtra Rains Live Updates
Maharashtra Rains Live UpdatesPudhari
Published on
Updated on

Mumbai Rain Live Update: नालासोपारा-विरारमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत

मुंबई : मुंबई आणि उपनगरांमध्ये आजही पावसाची संततधार कायम राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) शहरात दिवसभर ढगाळ वातावरणासह अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

खराब हवामानामुळे वळवण्यात आलेली 9 विमाने मुंबईत परतली

बुधवारी सकाळी खराब हवामान आणि कमी दृश्यमानतेमुळे मुंबई विमानतळावरील काही विमानांचे मार्ग बदलण्यात आले होते. मात्र हवामानात सुधारणा झाल्यानंतर मार्ग वळवण्यात आलेली सर्व 9 विमाने सुरक्षितपणे मुंबई विमानतळावर उतरली, अशी माहिती विमानतळ प्रशासनाने दिली.

हार्बर रेल्वे मार्गावरील सेवा उशिराने

सकाळच्या गर्दीच्या वेळेत पावसामुळे हार्बर रेल्वे मार्गावरील काही लोकल गाड्या उशिराने धावत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रवाशांना काही प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागला.

नालासोपारा-विरारमध्ये पाणी साचले

सततच्या पावसामुळे नालासोपारा आणि विरार परिसरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे. काही भागांमध्ये नागरिकांना पाण्यातून मार्ग काढत प्रवास करावा लागत असून वाहतूकही संथ झाली आहे. पाणी साचल्याने दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

मान्सून पुढील काही दिवस सक्रिय

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने नैऋत्य मान्सून पुढील दोन ते तीन दिवसांत संपूर्ण देशभर सक्रिय होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Maharashtra Rain Live Update: राज्यात पावसाचा जोर कायम; पुढील 6 दिवस महत्त्वाचे, हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने जोरदार पुनरागमन केले असून राज्यातील अनेक भागांत गेल्या पाच ते सहा दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सुरुवातीला जुलैच्या पहिल्या आठवड्यात तुलनेने कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा, कोल्हापूर आणि घाटमाथ्याच्या भागांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

या सलग पावसामुळे राज्यातील अनेक प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून काही धरणांमधून नियंत्रित पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. अनेक नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत असून काही जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सखल भागांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून काही ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, 1 ते 6 जुलै या अवघ्या सहा दिवसांत राज्यातील अनेक भागांत जून महिन्याएवढा किंवा त्याहून अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे यंदाच्या मान्सूनने जुलैच्या सुरुवातीलाच दमदार हजेरी लावल्याचे चित्र दिसत आहे.

दरम्यान, पुढील सहा दिवसही राज्यासाठी महत्त्वाचे ठरणार असून कोकण, मध्य महाराष्ट्र, घाटमाथा तसेच काही विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. काही भागांसाठी ऑरेंज आणि यलो अलर्टही जारी करण्यात आले आहेत.

प्रशासनाने नागरिकांना नदी-नाल्यांजवळ जाणे टाळावे, पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांवरून प्रवास करू नये, तसेच स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. विशेषतः डोंगराळ भागात दरड कोसळण्याचा धोका आणि सखल भागात पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेऊन सतर्क राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

Nashik Rain LIVE Updates: नाशिकमध्ये मुसळधार पाऊस; रस्ते पाण्याखाली, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

नाशिक शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांतील रस्त्यांवर पाणी साचले असून नागरिकांसह वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून काही ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक मार्गांवरील वाहतूक पर्यायी रस्त्यांकडे वळविण्यात आली आहे.

परिस्थिती हाताळण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केले आहे. शहरातील सर्व सहा विभागांतील अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी दिवस-रात्र पंपांच्या सहाय्याने रस्त्यांवर साचलेले पाणी नाल्यांमध्ये सोडण्याचे काम करत आहेत. तसेच मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे उन्मळून पडलेली मोठी झाडे व फांद्या हटवून रस्ते वाहतुकीसाठी मोकळे करण्याचे कामही सुरू आहे.

महापालिका प्रशासन शहरातील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. पाणी साचलेल्या भागातील नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, वाहतूक पोलिसांनी सुचविलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Maharashtra Rain Live Update: पालघर आणि नाशिक–पुणे घाट परिसरात अतिमुसळधार पावसाची शक्यता

हवामान इशारा

पालघर आणि नाशिक–पुणे घाट परिसरात अतिमुसळधार ते अति तीव्र पावसाची शक्यता. मुंबई, ठाणे, रायगड, नंदुरबार आणि नाशिक येथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. अत्यावश्यक कामाशिवाय प्रवास टाळा. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा आणि सुरक्षित ठिकाणी राहा.

आपत्कालीन मदत: 112 | 1070 | 1077

Raigad Rain Live Update: रायगडच्या रोह्यात पूरस्थिती गंभीर; मुसळधार पावसामुळे कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली

मुसळधार पावसामुळे कुंडलिका नदीने २३ मीटरची धोक्याची पातळी ओलांडत २४.४० मीटर गाठली आहे. नदीचे पाणी रोहा शहरासह मुख्य बाजारपेठेत शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

  • सखल भाग आणि बाजारपेठेत ३ ते ४ फूट पाणी

  • रोहा-नागोठणे आणि रोहा-कोलाड मार्ग वाहतुकीसाठी बंद

  • रोहा-अष्टमी जुना पूल पाण्याखाली; वाहतूक बंद

  • कोलाड रेस्क्यू टीम आणि प्रशासनाकडून बचावकार्य सुरू

  • नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि पूरग्रस्त भागात जाणे टाळावे.

Maharashtra Rain Live Update: गोदावरी नदीकाठच्या नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना

गोदावरी नदीकाठच्या नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना

नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून आज सकाळी ९ वाजल्यापासून गोदावरी नदीपात्रात १२ हजार ६२० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे, तसेच नदीपात्रातील साहित्य व जनावरे तात्काळ सुरक्षित स्थळी हलवावीत, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षाकडून करण्यात आले आहे.

आज सकाळी बंधाऱ्यातून ६ हजार ३१० क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू होता. पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन सकाळी ९ वाजता त्यात वाढ करून विसर्ग १२ हजार ६२० क्युसेक्स करण्यात आला आहे.

पावसाचे प्रमाण कायम राहिल्यास विसर्गात टप्प्याटप्प्याने आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने गोदावरी नदीपात्रालगतच्या परिसरातील नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी, नदीपात्रात कोणतेही साहित्य अथवा जनावरे असल्यास ती तात्काळ सुरक्षित स्थळी हलवावीत. तसेच पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Kolhapur Rain Live Update: कोल्हापूर जिल्हातील तालुका मुख्यालयाची पर्जन्यमानची आकडेवारी (MM)

कोल्हापूर जिल्हातील तालुका मुख्यालयाची पर्जन्यमानची आकडेवारी (MM)

1) कागल=7

2)गारगोटी=51.3

3) हातकणंगले-18

4) गडहिंग्लज -6

5) राधानगरी-124

6) आजरा=98

7) शिरोळ=4

8) शाहूवाडी-56

9) पन्हाळा=48

10) गगनबावडा-48

11) चंदगड=68

Maharashtra Rain Live Update: भीमाशंकर मार्गावर दरड कोसळली; वाहतूक बंद, पर्यटकांना सावधानतेचा इशारा

खेड तालुक्यातून भीमाशंकरकडे जाणाऱ्या कावडे–कारकुडी मार्गावरील रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिक आणि पर्यटकांना या मार्गाने प्रवास करू नये, असा इशारा दिला असून सुरक्षित पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

Maharashtra Rain Live Update: विदर्भात आठवडाभर पावसाचा अंदाज

हवामान विभागाने विदर्भात पुढील आठवडाभर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Maharashtra Rain Live Update: कुरुंदवाड–शिरढोण पुलावर पाणी; वाहतूक वळवली

पंचगंगा नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे पुलावर पाणी आले असून इचलकरंजीकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

Pune Rain Live Update: माळीण फाट्यावर दरड कोसळली; आहुपे मार्ग बंद

मुसळधार पावसामुळे माळीण फाट्याजवळ दरड कोसळून दोन घरांना धोका निर्माण झाला आहे. आहुपेकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

Pune Rain Live Update: जुन्नर–घोडेगाव मार्ग वाहतुकीसाठी बंद

चिंचोली पुलावरून पाणी वाहू लागल्याने प्रशासनाने जुन्नर–घोडेगाव मार्ग तात्पुरता बंद केला आहे.

Pune Rain Live Update: भीमाशंकर परिसरात अतिवृष्टी; घोड नदीला पूर

आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात घोड नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीकाठच्या काही गावांमध्ये पाणी शिरले असून नुकसान झाले आहे.

Mumbai Rain Live Update: मुंबईत पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात

दादर, वरळी, महालक्ष्मी आणि मलबार हिल परिसरात जोरदार पाऊस सुरू झाला असून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Jalgaon Rain Live Update: हतनूर धरणाचे सहा दरवाजे उघडले

जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणातून 11,195 क्युसेक वेगाने तापी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Ratnagiri Rain Live Update: गुहागरमध्ये मुख्य रस्ता खचला; वाहतूक ठप्प

रत्नागिरी जिल्ह्यातील विसापूर-पांगारी मार्ग सततच्या पावसामुळे साडेतीन ते चार फूट खचला आहे. गावाचा संपर्क तुटल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.

Raigad Rain Live Update: रायगडमध्ये पुन्हा पुरस्थिती; महाड, नागोठणे, रोहा पाण्याखाली

सावित्री, अंबा आणि कुंडलिका नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत असून महाड, नागोठणे आणि रोहा शहरांमध्ये पुन्हा पुराचे पाणी शिरले आहे.

Maharashtra Rain LIVE Updates: चणकापूर धरणातून पाण्याचा विसर्ग; रस्ता खचला

कळवण तालुक्यात मुसळधार पावसामुळे चणकापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वडाळा-आमदर मार्गावरील रस्ता खचल्याने वाहतूक प्रभावित झाली आहे.

Nashik Rain LIVE Updates: नाशिकमध्ये अनेक भागांत घरांमध्ये पाणी शिरले

सातपूर, पाथर्डी फाटा, रामचंद्र नगर आणि दिंडोरी रोड परिसरातील घरांमध्ये व पार्किंगमध्ये पाणी शिरले आहे. नागरिकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.

Nashik Rain LIVE Updates: रामकुंड परिसरात गोदावरीची पाणीपातळी वाढली

सलग पावसामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या कंबरेपर्यंत पुराचे पाणी पोहोचले असून अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.

Nashik Rain LIVE Updates: नाशिकमध्ये 120 मिमी पाऊस; अनेक भाग जलमय

नाशिक शहरात अवघ्या 12 तासांत 120 मिमी पावसाची नोंद झाली आहे. अनेक भागांत पाणी साचले असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Pune Rain LIVE Updates: लोणावळ्यात 48 तासांत तब्बल 1,290 मिमी पावसाची नोंद

घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कायम असून लोणावळ्यात गेल्या 48 तासांत 1,290 मिमी पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांतच 620 मिमी पाऊस झाला.

Pune Rain LIVE Updates: पुण्यातील एकता नगरमध्ये पाणी शिरले; खडकवासला धरणातून मोठा विसर्ग सुरू

खडकवासला धरण 100% भरल्याने मुठा नदीत मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे पुण्यातील एकता नगर परिसरात पाणी शिरले असून पुणे महापालिका अलर्ट मोडवर आहे.

Maharashtra Rain Live Update: पावसामुळे मुंबई, पुणे, नाशिक, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत

महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे मुंबई, पुणे, नाशिक, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असून अनेक रस्ते, पूल आणि घाटमार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news