'आयसीसी'ची वन-डे मानांकन यादी
एलिस पेरीचे 'टॉप १०'मध्ये पुनरागमन
दुबई : वृत्तसंस्था
भारतीय महिला क्रिकेट संघाची नवनियुक्त कर्णधार स्मृती मानधना हिने 'आयसीसी' महिला वन-डे फलंदाजी क्रमवारीतील आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाची स्टार ऑलपैलू खेळाडू एलिस पेरी हिने अव्वल १० मध्ये पुनरागमन केले.
नुकताच हरमनप्रीत कौरच्या जागी कर्णधारपदी निवड झालेली स्मृती मानधना ७९० गुणांसह वन-डे फलंदाजांच्या क्रमवारीतील पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. या यादीत नवव्या स्थानी असलेली हरमनप्रीत ही 'टॉप १०'मधील एकमेव अन्य भारतीय फलंदाज आहे.
गोलंदाजांच्या क्रमवारीत दीप्ती शर्माची एका स्थानाने घसरण झाली असून, ती नव्या क्रमांकावर गेली आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या अनाबेल सदरलँड आणि मेगन शूट यांनी क्रमवारीतील प्रगती करत अव्वल पाचमध्ये स्थान पटकावले आहे.
महिला टी-२० फलंदाजी क्रमवारीतील तीन भारतीय खेळाडूंनी अव्वल १० मध्ये आपले स्थान राखले आहे. यामध्ये शेफाली वर्मा (७९९ गुणांसह चौथे स्थान), स्मृती मानधना (७५४ गुणांसह पाचवे स्थान) आणि हरमनप्रीत कौर (६५६ गुणांसह दहावे स्थान) यांचा समावेश आहे. टी-२० मध्ये श्री चरणी, दीप्ती पहिल्या दोन क्रमांकांवर आहेत.
महिलांच्या टी-२० गोलंदाजी क्रमवारीत श्री चरणी (८१७ गुण) आणि दीप्ती शर्मा (७५४ गुण) या अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी आहेत. टी-२० अष्टपैलू खेळाडूंच्या अव्वल १० च्या क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेली दीप्ती ही एकमेव भारतीय खेळाडू ठरली आहे. याशिवाय, वन-डे अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत ती सहाव्या क्रमांकावर आहे. दरम्यान, महिलांच्या टी-२० आणि वन-डे या दोन्ही प्रकारातील सांख्यिक क्रमवारीतील भारतीय संघाने आपले तिसरे स्थान कायम राखले आहे.