क्वालालंपूर : वृत्तसंस्था भारताची महिला स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने मलेशिया मास्टर्स सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. 28 वर्षीय सिंधूने महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत चीनच्या बिंग जियाओवर 21-13, 17-21, 21-15 असा विजय मिळविला. सिंधूबरोबरच पी. कश्यप, एचएस प्रणय, साई प्रणीत यांनी दुसर्या फेरीत प्रवेश केला. तर सायना व समीर वर्मा यांना पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला.
पुरुष एकेरीत भारताच्या साई प्रणितनेही विजयी सलामी देताना टोकिओ ऑलिम्पिकचा सेमिफायनॅलिस्ट खेळाडू केविन कॉर्डन गौतेमला याचा 21-8, 21-9 असा धुव्वा उडविला. तर एचएस प्रणयने फ्रान्सच्या ब्रिज लेवरडेजचा 21-19, 21-14 असा एकतर्फी पराभव केला. तर पी. कश्यपनेही दुसर्या फेरीत प्रवेश करताना इंडोनेशियाच्या टॉमी सुगियार्तोचा 16-21, 21-16, 21-16 असा पराभव केला.
दरम्यान, महिला गटात सायना नेहवालला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. तिने पहिला गेम जिंकून चांगली सुरुवात केली होती. पण कोरियाच्या किम गा इयूनने सायनावर 16-21, 21-17, 21-14 असा विजय मिळविला. यामुळे सायनाचे आव्हान संपुष्टात आले. तर समीर वर्माला तैवानच्या चाऊ टिन चेनकडून 21-10, 21-12, 21-14 असा पराभव पत्करावा लागला.
हेही वाचा