Shubman Gill GT vs CSK IPL 2026 file photo
स्पोर्ट्स

Shubman Gill: शुभमन गिलने आधी पकडला सीझनचा सर्वात भयंकर कॅच! नंतर थेट चेन्नईच्या चाहत्यांनाच डिवचलं; पाहा व्हिडिओ

गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यात गुजरातचा कर्णधार शुभमन गिल याने घेतलेला एक अप्रतिम झेल सामन्याचा निर्णायक क्षण ठरला.

मोहन कारंडे

Shubman Gill GT vs CSK IPL 2026

अहमदाबाद: गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यात गुजरातचा कर्णधार शुभमन गिल याने घेतलेला एक अप्रतिम झेल सामन्याचा निर्णायक क्षण ठरला. चेन्नईसाठी एकहाती लढणाऱ्या शिवम दुबे याची धडाकेबाज खेळी संपताच सीएसकेच्या प्लेऑफच्या आशाही जवळपास संपुष्टात आल्या. त्यानंतर शुभमन गिलने केलेल्या सेलिब्रेशनची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

गुजरातने प्रथम फलंदाजी करताना २२९ धावांचा डोंगर उभा केला. शुभमन गिलने ३७ चेंडूत ६४ धावांची दमदार खेळी केली, तर साई सुदर्शनने ५३ चेंडूत ८४ धावा ठोकत संघाला भक्कम सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १०० धावांची विक्रमी भागीदारी करत चेन्नईच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण केला. त्यानंतर जोस बटलरने अवघ्या २७ चेंडूत नाबाद ५७ धावांची स्फोटक खेळी करत गुजरातला ४ बाद २२९ धावांपर्यंत पोहोचवले.

CSK ची सुरुवात निराशाजनक

२३० धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना, चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. पॉवरप्लेच्या मध्यापर्यंतच, संघाने आपल्या तीन महत्त्वाच्या विकेट्स गमावल्या होत्या आणि धावसंख्या केवळ २९ धावांवर होती. त्यानंतर, शिवम दुबे फलंदाजीला आला आणि त्याने गुजरातच्या गोलंदाजांवर त्वरित प्रतिहल्ला चढवला. मैदानाच्या चारही दिशांना चौकार आणि षटकारांचा वर्षाव करत, दुबेने केवळ १६ चेंडूंत ४७ धावांची धडाकेबाज खेळी साकारली आणि सामन्यात पुन्हा एकदा उत्कंठा निर्माण केली. त्याने तर स्टार फिरकी गोलंदाज रशीद खानच्या षटकातील अगदी पहिल्याच चेंडूवर एक गगनचुंबी षटकार ठोकला, ज्यामुळे गुजरातच्या गोटात चिंतेची लाट पसरली.

शुभमन गिलने टिपला अप्रतिम झेल

मात्र, याच षटकात राशिद खानने फिरकीची कमाल दाखवत दुबेला जाळ्यात अडकवले. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात दुबेचा चेंडू हवेत गेला आणि ऑफ-साइडच्या दिशेने सरकला. तिथे क्षेत्ररक्षण करत असलेल्या शुभमन गिलने मागे धावत जाऊन अखेरच्या क्षणी अफलातून डाइव्ह मारत झेल पकडला. हा झेल पाहून स्टेडियममधील प्रेक्षकही थक्क झाले.

शुभमन गिलचा तो इशारा, सोशल मीडियावर रंगली चर्चा

दुबेला बाद केल्यानंतर शुभमन गिलने चेन्नईच्या चाहत्यांकडे पाहत ओठांवर बोट ठेवून ‘शांत बसा’ असा इशारा केला. त्याचा हा अंदाज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शिवम दुबे बाद होताच चेन्नईची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली आणि संपूर्ण संघ १४ षटकांत अवघ्या १४० धावांवर गारद झाला. गुजरात टायटन्सने तब्बल ८९ धावांनी एकतर्फी विजय मिळवत दमदार कामगिरीची नोंद केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT