स्पोर्ट्स

Shubman Gill vs Bradman : गिलच्या निशाण्यावर सर ब्रॅडमन यांचा 95 वर्षे जुना विश्वविक्रम! मोडण्यासाठी 3 कसोटीत 390 धावांची गरज

इंग्लंडमध्ये धावांचा पाऊस पाडणाऱ्या शुभमन गिलमुळे गावस्करांचा 54 वर्षे जुना विक्रमही धोक्यात

रणजित गायकवाड

shubman gill needs 390 runs to break sir don Bradman's test series record

भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलने इंग्लंडविरुद्धच्या सुरुवातीच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये धावांचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. त्याच्या या दमदार खेळीमुळे भारतीय संघाने पहिल्या सामन्यात 835 धावा, तर दुसऱ्या सामन्यात तब्बल 1014 धावा जमवल्या. सध्या सुरू असलेल्या मालिकेत गिल सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात द्विशतक आणि दुसऱ्या डावात शतक झळकावले. याच उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर, एका मालिकेत सर्वाधिक धावा करण्याच्या सर डॉन ब्रॅडमन यांच्या विश्वविक्रमाला त्याने आव्हान दिले आहे.

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत गिल ज्या फॉर्मात खेळत आहे, ते पाहता तो ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज फलंदाज ब्रॅडमन यांचा एका मालिकेत फटकावलेल्या 974 धावांचा विश्वविक्रम मोडू शकतो. ही मजल मारण्यासाठी त्याला मालिकेतील उर्वरित तीन सामन्यांमध्ये 390 धावा कराव्या लागतील.

ब्रॅडमन यांनी 1930 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या ॲशेस मालिकेत मालिकेत 974 धावा कुटल्या होत्या. या दरम्यान त्यांनी 4 शतके झळकावली. त्यांची सर्वोच्च धावसंख्या 334 होती.

सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज

दरम्यान, गिल हा ब्रॅडमन यांना मागे टाकण्यापूर्वी माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचे दोन विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. त्यासाठी त्याला 189 आणि 147 धावांची गरज आहे. गावस्कर यांनी 1971 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या चार सामन्यांच्या मालिकेत 774 धावा केल्या होत्या. त्यांचा हा विक्रम आजही अबाधित आहे. कोणत्याही भारतीय फलंदाजाला हा विक्रम मोडता आलेला नाही. या यादीत दुसऱ्या क्रमांकावरही लिटील मास्टर गावस्कर हेच आहेत, ज्यांनी 1978-79 मध्ये कॅरेबियन संघाविरुद्धच्या मायदेशातील मालिकेत सहा कसोटी सामन्यांत 732 धावा केल्या होत्या. तिसऱ्या क्रमांकावर सध्याचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल आहे, ज्याने 2023-24 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या मायदेशातील मालिकेत पाच सामन्यांत 712 धावा फटकावल्या होत्या.

रन मशीन विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2014-15 च्या मालिकेत चार सामन्यांत 692 धावा केल्या होत्या. गिलने एजबॅस्टन कसोटीत इंग्लंडविरुद्ध 430 धावांचा पाऊस पाडला. जी कसोटी क्रिकेटमधील एका सामन्यातील दुसरी सर्वाधिक धावसंख्या आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर इंग्लंडचे माजी कर्णधार ग्रॅहम गूच आहेत, ज्यांनी 1990 मध्ये भारताविरुद्धच्या लॉर्डस कसोटी सामन्यात 456 धावा केल्या होत्या.

गिलने कोहलीला मागे टाकले

गिलने या इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये 585 धावा केल्या आहेत. मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांनंतर ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. पहिल्या क्रमांकावर ग्रॅमी स्मिथ आहे, ज्याने 2003 मध्ये इंग्लंडमध्ये 621 धावा केल्या होत्या. कर्णधार म्हणून पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून गिलने आता अव्वल स्थान पटकावले आहे; त्याने कोहलीच्या 449 धावांना मागे टाकले.

गिल हा एकाच कसोटीच्या दोन्ही डावांत 150 पेक्षा अधिक धावा करणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी 1980 मध्ये ॲलन बॉर्डर यांनी पाकिस्तानविरुद्ध लाहोरमध्ये नाबाद 150 आणि 153 धावा करून अशी कामगिरी केली होती.

एकाच कसोटीत शतक आणि द्विशतक झळकावणाऱ्या नऊ फलंदाजांपैकी तो एक बनला आहे. भारतीयांमध्ये गिलपूर्वी सुनील गावस्कर यांनी हा पराक्रम केला होता.

गिलपूर्वी दोन भारतीय कर्णधारांनी एका कसोटीच्या दोन्ही डावांत शतके झळकावली होती. गावसकर यांनी 1978 मध्ये ईडन गार्डन्सवर वेस्ट इंडिजविरुद्ध 107 आणि नाबाद 182 धावा, तर विराट कोहलीने 2014 मध्ये ॲडलेड येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध 115 आणि 141 धावा केल्या होत्या.

यासोबतच, इंग्लंडमध्ये कसोटीच्या दोन्ही डावांत शतक झळकावणारा गिल हा दुसरा भारतीय फलंदाज आहे. यापूर्वी हेडिंग्ले येथे झालेल्या कसोटीत ऋषभ पंतने अशी कामगिरी केली होती. सध्याच्या भारतीय कर्णधाराकडे या मालिकेत गावस्कर यांचा 54 वर्षे जुना विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी आहे. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि विराट कोहली यांसारखे दिग्गज फलंदाज जे करू शकले नाहीत, तो पराक्रम करण्याची संधी गिलला या मालिकेत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT