स्पोर्ट्स

Shubman Gill : शुभमनला संघातून का वगळले? आगरकर म्‍हणाले, "तो उत्तम खेळाडू, पण..."

शुभमन गिलचे बाहेर राहणे दुर्दैवी असले, तरी संघाच्या गरजेनुसार हा निर्णय घ्यावा लागला

पुढारी वृत्तसेवा

Ajit Agarkar on Shubman Gill excluded

मुंबई : आगामी पुरुष टी-२० विश्वचषक संघाची आज (२० डिसेंबर) मुंबईत भारतीय संघाची घोषणा करण्‍यात आली. या निवडीमध्‍ये सर्वांत मोठा धक्का सलामीवीर शुभमन गिलला बसला आहे. त्‍याने केवळ टी-२० संघाचे उपकर्णधारपद गमावलेले नाही तर संघातूनही त्‍याला वगळण्‍यात आले आहे. याबाबत निवड समितीचे अध्‍यक्ष अजित आगरकरांनी आपली भूमिका स्‍पष्‍ट केली आहे.

काय म्हणाले अजित आगरकर?

शुभमनला वगळण्याबाबत स्पष्टीकरण देताना निवड समितीचे अध्यक्ष अजित अगरकर म्हणाले, "शुभमन एक दर्जेदार खेळाडू आहे, यात शंका नाही. मात्र, संघाचे संतुलन आणि संयोजन राखणे अधिक महत्त्वाचे असते. संघ निवडीत कधी कधी कठोर निर्णय घ्यावे लागतात आणि एखाद्या खेळाडूला बाहेर बसावे लागते."

संघाच्‍या गरजेनुसार हा निर्णय घ्‍यावा लागला

"शुभमन जेव्हा कसोटी सामन्यांमध्ये व्यस्त होता, तेव्हा अक्षर पटेलकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले होते. आम्हाला असा यष्टीरक्षक हवा होता जो सलामीला फलंदाजी करू शकेल, त्यामुळे जितेशचा विचार झाला. तसेच, रिंकू सिंगच्या समावेशामुळे खालच्या फळीत संघाला अधिक मजबुती मिळेल. शुभमनचे बाहेर राहणे दुर्दैवी असले, तरी संघाच्या गरजेनुसार हा निर्णय घ्यावा लागला, असेही आगरकरांनी स्‍पष्‍ट केले.

भारतीय क्रिकेटमध्ये पर्यायांची कमतरता नाही

"भारतीय क्रिकेटमध्ये पर्यायांची कमतरता नाही. खेळाडूची निवड करणे सोपे नसते. शुभमन प्रतिभावान आहे, पण सध्याचा फॉर्म आणि संघ संयोजन पाहता आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. याचा अर्थ असा नाही की तो खराब खेळाडू आहे," असेही आगरकरांनी पत्रकार परिषदेत नमूद केले.

शुभमनची टी-२० मधील कामगिरी अत्‍यंत निराशाजनक

शुभमन गिलने आशिया चषक २०२५ च्या माध्यमातून टी-२० संघात पुनरागमन केले होते आणि त्याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारीही सोपवण्यात आली होती. मात्र, या वर्षातील टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. त्याने यंदाच्या वर्षात एकही अर्धशतक झळकावलेले नाही. सातत्याने मिळत असलेल्या संधींचे सोने करण्यात तो अपयशी ठरल्याने अखेर निवड समितीने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

दुखापतींचे सत्र

फॉर्मसोबतच दुखापतींनीही शुभमनची पाठ सोडलेली नाही. गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान त्याच्या मानेला दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यानंतर टी-२० मालिकेत पुनरागमन केले खरे, पण ४, ० आणि २८ अशा धावसंख्येवर तो बाद झाला. लखनौ टी-२० पूर्वी त्याला पुन्हा दुखापत झाली, ज्यामुळे तो निर्णायक सामन्याला मुकला होता.

टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, रिंकू सिंह, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर आणि ईशान किशन.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT