आयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्जचे यशस्वी नेतृत्व करत संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवणारा श्रेयस अय्यर आता नजीकच्या भविष्यात भारतीय मर्यादित षटकांच्या संघाच्या कर्णधारपदीही विराजमान होऊ शकेल, अशी शक्यता ठळक चर्चेत आली आहे. विद्यमान केंद्रीय करार श्रेणीत त्याचा समावेश नाही. मात्र, आयपीएलमधील त्याच्या धडाकेबाज कामगिरीमुळे भारतीय व्यवस्थापनाचेही त्याने अर्थातच लक्ष वेधून घेतले आहे. यावरूनच त्याची मर्यादित षटकांच्या क्रिकेट कर्णधारपदी वर्णी लागू शकते, असा होरा आहे.
गेल्या वर्षी कोलकाता नाईट रायडर्सला विजेतेपद मिळवून दिल्यानंतरही श्रेयसला या हंगामापूर्वी त्या संघाने मुक्त केले होते. मात्र, पंजाब किंग्ज या तुलनेने संघर्ष करणार्या संघाची धुरा सांभाळत त्याने संघाला अंतिम फेरीपर्यंत नेऊन आपल्या नेतृत्वगुणांची प्रभावीपणे ओळख करून दिली. आयपीएल 2025 चा तो सर्वोत्कृष्ट कर्णधार म्हणून गणला जात आहे. सुरुवातीला बीसीसीआयच्या केंद्रीय करारातून वगळण्यात आल्यानंतरही त्याने ही लक्षवेधी कामगिरी करून दाखवली आहे.
सध्या भारताच्या वन डे संघाचे नेतृत्व रोहित शर्मा, टी-20 संघाचे सूर्यकुमार यादव आणि कसोटी संघाचे शुभमन गिल करत आहेत. परंतु, ही त्रि-कर्णधार पद्धत दीर्घकाळ चालण्याची शक्यता कमी आहे. रोहित शर्मा लवकरच एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याची शक्यता असल्याने, भारत एका एकत्रित मर्यादित षटकांच्या कर्णधाराच्या शोधात असेल. सूर्यकुमार यादव एकदिवसीय संघात आपले स्थान अद्याप पक्के करू शकलेला नाही, त्यामुळे तो दोन्ही मर्यादित षटकांच्या स्वरूपात नेतृत्व करण्याची शक्यता कमी वाटते. अशा परिस्थितीत, एकदिवसीय क्रिकेटमधील श्रेयस अय्यरची सातत्यपूर्ण कामगिरी त्याला कर्णधारपदासाठी एक प्रबळ दावेदार बनवते.
निवड समितीने नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंड कसोटी मालिकेसाठी 18 सदस्यीय संघात अय्यरकडे दुर्लक्ष केले होते; परंतु मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी स्पष्ट केले आहे की, जर अय्यरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रभावी कामगिरी सुरू ठेवली, तर त्याला कसोटी संघात स्थान मिळू शकते. एकंदरीत, आयपीएलमधील प्रभावी नेतृत्व आणि फलंदाजीतील सातत्य यामुळे श्रेयस अय्यरने केवळ भारतीय संघात जोरदार पुनरागमनच केले नाही, तर भविष्यातील कर्णधार म्हणूनही आपली दावेदारी अत्यंत मजबूत केली आहे.