Shreyas Iyer health update
नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान झालेल्या भयंकर दुखापतीतुन सावरत असलेला भारतीय वन-डे संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर सिडनी येथील रुग्णालयाच्या आयसीयू मध्ये आहे. अॅलेक्स कॅरीला बाद करण्यासाठी मागे धावत जाऊन त्याने जो जबरदस्त झेल घेतला, त्या प्रयत्नात त्याच्या डाव्या बरगडीला दुखापत झाली. शनिवारी ड्रेसिंग रूममध्ये परतल्यानंतर त्याला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, त्याच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी माहिती दिली आहे.
'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, डॉक्टरांनी सांगितलं की, प्लीहा फुटल्याने अंतर्गत रक्तस्राव झाला आहे. पडण्याच्या धक्क्यामुळे बरगड्यांच्या खालील भाग फाटल्यासारखा झाला आणि त्यामुळे शरीरात तीव्र अंतर्गत रक्तस्त्राव सुरू झाला.
दरम्यान, ड्रेसिंग रूममध्येच त्याची अवस्था खूपच वाईट झाली होती. त्याचा रक्तदाब धोक्याच्या पातळीपर्यंत खाली आल्याचे लक्षात येताच बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने कोणतीही दिरंगाई न करता त्याला त्वरित रुग्णालयात दाखल केले. 'परिस्थिती अगदी गंभीर होती, पण वैद्यकीय टीमच्या तत्परतेमुळे त्याला वेळेवर उपचार मिळाले,' असे घडामोडींवर लक्ष ठेवून असलेल्या सूत्रांनी सांगितले.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही, परंतु अय्यरला आणखी दोन दिवस आयसीयूमध्येच ठेवले जाण्याची शक्यता आहे. पुढील ४८ तासांत रक्तस्राव थांबला नाही, तर त्याचा ICU मधील काळ वाढवला जाऊ शकतो. डॉक्टरांच्या मते, पुढील सात दिवस अय्यर रुग्णालयातच राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, 'बीसीसीआय'च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अय्यरला ३० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी वन-डे मालिकेसाठी उपलब्ध होणे अनिश्चित असेल.