स्पोर्ट्स

Shreyas Iyer | टीम इंडिया T-20चा नवा कर्णधार श्रेयस अय्यरचे पहिलेच विधान रोखठोक, "मी कोणाच्याही सावलीत..."

गौतम गंभीर यांच्यावर थेट निशाणा असल्याची रंगली क्रिकेट वर्तुळात चर्चा

पुढारी वृत्तसेवा

Shreyas Iyer Gautam Gambhir controversy : कर्णधारपद आव्‍हान आहे मी त्‍याचा आनंद घेतो; परंतु यासाठी स्वतःचे व्यक्तिमत्त्व किंवा क्रिकेटप्रती असलेला दृष्टिकोन बदलण्याची गरज पडणार नाही. मी कोणाच्‍याही सावलीत राहून काम करणार नाही, अशा रोखठोक शब्‍दा टीम इंडियाच्‍या T-20 संघाचा नवा कर्णधार श्रेयस अय्यर आपलं मत मांडलं. शनिवारी भारतीय निवड समितीने आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी श्रेयस अय्यरची भारताचा नवा टी-२० कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. यामुळे भारतीय मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील एका नवीन युगाची सुरुवात झाली आहे.

मुंबईतील क्रिकेट संस्‍कृतीने घडवली मानसिकता

मुंबईत 'काबुनी प्रीमियर लीग'च्या (Kabuni Premier League) एका प्रमोशनल कार्यक्रमात बोलताना अय्यरने, मुंबईतील स्पर्धात्मक क्रिकेट संस्कृतीने त्याची मानसिकता कशी घडवली आणि त्याला नेतृत्वपदाच्या जबाबदाऱ्यांसाठी कसे तयार केले, यावर प्रकाश टाकला. तो म्‍हणाला, "लहानपणापासूनच मला आव्हाने स्वीकारायला आवडायचे, विशेषतः मुंबईचा असल्याने, जिथे क्रिकेट खूप मोठे आहे आणि स्पर्धा कमालीची आहे. गल्लीबोळातील प्रत्येक मुलाला क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करायचे असते. त्यामुळे लहानाचा मोठा होत असताना मी अनेक आव्हानांचा सामना केला. म्हणूनच, ज्यांच्याशी माझी स्पर्धा असायची, त्या प्रत्येकाविरुद्ध जिंकणे हाच माझा नेहमीचा विचार असायचा."

तुम्ही काय शिकता किंवा जिंकता हे दुय्यम आहे

३० वर्षीय श्रेयसने पुढे सांगितले की, जबाबदारी घेण्यामुळे त्याला नेहमीच प्रेरणा मिळते आणि कर्णधारपद ही आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःला सिद्ध करण्याची आणखी एक मोठी संधी आहे. तुम्ही काय शिकता किंवा जिंकता हे दुय्यम आहे, पण लहानाचा मोठा होत असताना तुम्ही जितकी जास्त मजा करता, तितकीच तुमची स्पर्धात्मक वृत्ती वाढते. विशेषतः क्रिकेट किंवा इतर कोणताही खेळ खेळताना. मला वाटते की हीच गोष्ट तुम्हाला पुढच्या स्तरावर घेऊन जाते आणि मग तुम्हाला अशी जबाबदारी घेण्याची इच्छा होते."

कर्णधारपदासाठी मला माझे व्यक्तिमत्त्व बदलण्याची गरज नाही

"आता मला कर्णधार म्हणून ही जबाबदारी मिळाली आहे, हे एक मोठे आव्हान आहे. पण त्याच वेळी, मला माझे व्यक्तिमत्त्व बदलण्याची गरज नाही. मी पूर्वी जसा होतो, तसाच मला राहायचे आहे. मला दुसऱ्या कोणासारखे बनण्याचा किंवा कोणाच्या सावलीत राहण्याचा प्रयत्न करायचा नाही," असेही श्रेयसने स्‍पष्‍ट केले.

श्रेयसचे विधान गौतम गंभीर यांच्‍याशी जोडले जात आहे

मला दुसऱ्या कोणासारखे बनण्याचा किंवा कोणाच्या सावलीत राहण्याचा प्रयत्न करायचा नाही, असे श्रेयसने स्‍पष्‍ट केल्‍याने आता या विधानाचासंदर्भात टीम इंडियाचे मुख्‍य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्‍याशी जोडला जात आहे. २०२४ च्या आयपीएल हंगामात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली आणि गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली (Mentorship) कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) दिमाखात विजेतेपद पटकावले होते. मैदानावर अय्यरने अप्रतिम रणनीती आखली असली, तरी क्रिकेट जगताने या विजयाचे बहुतांश श्रेय 'गंभीर इफेक्ट'ला दिले होते. यावरून दोघांमध्ये काहीसे मतभेद असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आयपीएल २०२४ च्या यशानंतर श्रेयसला डावलले गेल्यासारखे वाटत होते आणि याच नाराजीतून त्याने केकेआर सोडली व आयपीएल २०२५ पूर्वी पंजाब किंग्समध्ये प्रवेश केला, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली होती.

गौतम गंभीर यांच्‍यावर थेट निशाणा साधला का?

अय्यरचे "मी कोणाच्याही सावलीत खेळणार नाही" हे रोखठोक विधान त्याचा माजी मार्गदर्शक गौतम गंभीर याच्यावर थेट निशाणा असल्याचे मानले जात असून, यामुळे चर्चांना उधाण आले आहे. अर्थात, या दोघांनी कधीही त्यांच्यातील वादाची जाहीर कबुली दिलेली नाही. आयपीएल २०१८ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्समधून गंभीरनेच श्रेयसला पहिल्यांदा कर्णधारपदाची संधी दिली होती. मात्र, आता हे दोन खमक्या स्वभावाचे खेळाडू भारताच्या नव्या टी-२० युगाला दिशा देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकत्र आले असताना, अय्यरच्या या वक्तव्याने हे स्पष्ट केले आहे की, तो स्वतःच्या अटींवरच संघ चालवणार आहे.

श्रेयस अय्यरला भारताचा टी-२० कर्णधार का बनवण्यात आले?

गेल्या दोन आयपीएल हंगामात कर्णधार म्हणून श्रेयसचा आलेख कमालीचा उंचावला आहे आणि त्याचेच फळ म्हणजे त्याला मिळालेले हे कर्णधारपद होय. त्याने २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले, तर २०२५ मध्ये पंजाब किंग्सला फायनलपर्यंत नेले. त्याच्या शांत नेतृत्वशैलीचे आणि रणनीतीचे सर्वत्र कौतुक झाले. आयपीएल २०२६ मध्ये पंजाब किंग्स प्ले-ऑफमध्ये पोहोचू शकली नसली, तरी कर्णधार म्हणून श्रेयसची प्रतिष्ठा आणखी वाढली. २०२५ मध्ये आयपीएलमधील पहिले शतक झळकावल्यानंतर, त्याने २०२६ च्या हंगामातही ५५.२३ च्या सरासरीने आणि १६८.८१ च्या स्ट्राईक रेटने ४९८ धावा केल्‍या आहेत. याच कामगिरीमुळे पुढील टी-२० विश्वचषक आणि या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या आशियाई खेळांच्या तयारीच्या दृष्टीने निवड समितीने अखेर त्याच्याकडे संघाची धुरा सोपवण्याचा निर्णय घेतला.

श्रेयस अय्यर पहिल्यांदा भारताचे नेतृत्व कधी करणार?

भारताचा टी-२० कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरची पहिली परीक्षा आगामी आयर्लंड दौऱ्यावर असेल.भारत आयर्लंडविरुद्ध दोन टी-२० सामने खेळणार असून, त्यानंतर संघ पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी इंग्लंडला रवाना होईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याची आणि आगामी जागतिक स्पर्धांच्या दृष्टीने संघाची बांधणी करण्याची अय्यरसाठी ही पहिलीच संधी असेल.उपकर्णधार तिलक वर्मा, संघात पुनरागमन करणारा वेगवान गोलंदाज हर्षित राणा आणि अनेक युवा खेळाडूंचा समावेश असलेल्या या मालिकेत, भारतीय क्रिकेटच्या नव्या टी-२० युगात अय्यरच्या नेतृत्वशैलीची पहिली झलक पाहायला मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT