पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाब किंग्जने आयपीएल 2025 च्या हंगामासाठी संघाच्या नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. फ्रँचायझीने श्रेयस अय्यरची नवीन कर्णधार म्हणून निवड केली आहे. रविवारी (दि.12) पंजाब किंग्जने याची अधिकृत घोषणा केली. नवीन संघामध्ये प्रमुख जबाबदारी मिळाल्यानंतर श्रेयसने म्हटले की, "संघाने माझ्यावर विश्वास व्यक्त केला आहे, याचा मला सन्मान वाटतो. प्रशिक्षक पॉन्टिंगसोबत पुन्हा काम करण्यास मी उत्सुक आहे. मला आशा आहे की, मी संघाला पहिले विजेतेपद जिंकून संघ व्यवस्थापनाने दाखवलेल्या विश्वासाची परतफेड करू शकेन."
आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात पंजाब किंग्जने श्रेयस अय्यरला विक्रमी किमतीत त्यांच्या संघात सामील केले. श्रेयस काही काळासाठी आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू होता. पण लखनौ सुपर जायंट्सने 27 कोटी रुपयांना ऋषभ पंतला खरेदी केले. त्यामुळे श्रेयस इतिहासातील दुसरा सर्वात महाग खेळाडू ठरला. पंजाबने श्रेयससाठी 26.75 कोटी रुपयांची बोली लावली होती. गेल्या हंगामात, शिखर धवनच्या अनुपस्थितीत सॅम करन पंजाबचे नेतृत्व केले, पण यावेळी पंजाबने त्याला कायम ठेवले नाही.
श्रेयसने मागील हंगामात कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) ची जबाबदारी स्वीकारली होती. या हंगामामध्ये त्याच्या नेतृत्वाखाली संघाने 10 वर्षांनंतर जेतेपद जिंकले. यावेळी श्रेयसने कर्णधारपद भुषवत आपले नेतृत्व कौशल्य दाखवून दिले. म्हणूनच आता पंजाब किंग्जने त्याला नवीन जबाबदारी दिली आहे.
पंजाब किंग्ज हा श्रेयस अय्यरच्या आयपीएलमधील कारकिर्दीतील तिसरा संघ आहे. यापूर्वी तो कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला आहे. दिल्ली कॅपिटल्ससोबतच्या कारकिर्दीत (2015-21) यावेळी त्याने एक आक्रमक फलंदाज म्हणून नावलौकिक मिळवला. 2021 मध्ये श्रेयस पंतच्या नेतृत्वाखाली खेळला. यानंतर 2022 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) मध्ये सामील झाल्यानंतर अय्यरने 2024 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली कोलकात्याला तिसरे विजेतेपद मिळवून दिले.
अय्यरने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 31.67 च्या सरासरीने 2 हजार 375 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 123.96 आहे. या दरम्याने त्याने 16 अर्धशतके झळकावली आहेत. त्याचा सर्वोत्तम स्कोअर 96 धावा आहे. केकेआरसाठीच्या त्याने गतवर्षी 15 सामन्यांमध्ये 39.00 च्या सरासरीने आणि 146 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने 351 धावा कुटल्या. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे.