पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने रागात एक वक्तव्य केले. त्याने न्यूझीलंडने पाकिस्तानचे क्रिकेट संपवले असल्याचे ट्विट केले. पाकिस्तान गेल्या काही दिवसांपासून त्यांचे बंद पडलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा सुरु करण्याचा जोरदार प्रयत्न करत आहे. क्रिकेट विश्वातील नावाजलेल्या संघांनी पाकिस्तानात येऊन मालिका खेळावी यासाठी ते जोर लावत आहेत.
मात्र या प्रयत्नांना न्यूझीलंड क्रिकेट संघाने शुक्रवारी सुरुंग लावला. न्यूझीलंडने रावळपिंडीमधील पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वीच मालिकेतून माघार घेतली. न्यूझीलंड 2003 नंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात पाय ठेवणार होता. मात्र त्यांनी सुरक्षेच्या कारणावरुन मालिकेतून माघार घेतली.
न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने आपल्या वक्तव्यात म्हटलं आहे की, 'पाकिस्तानबाबतची धोक्याची लेवल न्यूझीलंड सरकारने वाढवली आहे. याचबरोबर न्यूझीलंड क्रिकेट मंडळाच्या सुरक्षा सल्लागारांनी दिलेल्या सल्ल्यानंतर ब्लॅककॅप्स आपला पाकिस्तान दौरा सुरु ठेवणार नाही.'
न्यूझीलंडने शेवटच्या क्षणाला पाकिस्तानला दणका दिल्याने तेथील क्रिकेटमधील रथीमहारथी चांगलेच लाल झाले. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब आख्तरने तर न्यूझीलंडने पाकिस्तानचे क्रिकेट संपवले अशी तीव्र प्रतिक्रिया ट्विटरवर दिली. त्याने आपल्या 'न्यूझीलंडने पाकिस्तानचे क्रिकेट संपवले.' असे पहिले ट्विट केले. त्यानंतर त्याने 'रावळपिंडीमधून वाईट बातमी.' असे दुसरे ट्विट केले.
शोएब अख्तर बरोबरच पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमनेही ट्विट करुन न्यूझीलंडच्या निर्णयावर निराशा व्यक्त केली. त्याने 'अचानक मालिका पुढे ढकलल्यामुळे खूप निराशा झाली. या मालिकेमुळे लाखो पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले असते. मला आमच्या सुरक्षा दळांवर आणि त्यांच्या कार्यक्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. ते आमचा अभिमान आहेत आणि कायम राहणार!' असे ट्विट केले.
न्यूझीलंडने पाकिस्तानतून आयत्या वेळी काढता पाय घेतल्याने पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रदीनेही न्यूझीलंडवर टीका केली. त्याने 'तुम्ही चुकीच्या धोक्याच्या इशाऱ्यावर मालिकेतून माघार घेतली. तुम्हाला सर्व बाबतीत आश्वस्त केले असतानाही तुम्ही माघार घेतली. ब्लॅककॅप्स तुम्हाला तुमच्या निर्णयाचा काय परिणाम होईल याची कल्पना तरी आहे का?' असे ट्विट केले.
दरम्यान, न्यूझीलंड क्रिकेटचे सीईओ डेव्हिड व्हाईट यांनी सांगितले की मालिकेतून माघार घेणे हा एकमेव पर्याय आमच्या समोर होता. याचा पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर काय परिणाम होणार आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. ते एक चांगले आयोजक आहेत. पण, खेळाडूंची सुरक्षा ही सर्वोच्च आहे आणि त्यामुळेच आम्हाला माघार घेणे हा एकमेव योग्य पर्याय असल्याचे वाटते.'
न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने न्यूझीलंडच्या खेळाडूंना पाकिस्तानातून बाहेर काढण्यासाठी योग्य ती सोय केल्याचे सांगितले.