Shivam Dube Flats Mumbai Pudhari
स्पोर्ट्स

Shivam Dube Flats Mumbai: शिवम दुबेची मोठी गुंतवणूक! मुंबईत घेतले दोन आलिशान फ्लॅट; किंमत वाचून थक्क व्हाल

Shivam Dube Mumbai House: टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर चर्चेत आलेला भारतीय क्रिकेटपटू शिवम दुबे आता मुंबईतील महागड्या मालमत्तेमुळे पुन्हा चर्चेत आहे. ओशिवरा परिसरातील DLH एन्क्लेव्ह प्रोजेक्टमध्ये त्याने २७.५ कोटी रुपयांचे दोन आलिशान फ्लॅट खरेदी केले आहेत.

Rahul Shelke

Shivam Dube Mumbai House Price: भारताने सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर संघातील अनेक खेळाडू चर्चेत आले आहेत. विशेषतः संजू सॅमसन आणि इशान किशन यांच्याबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र या सर्वांमध्ये आणखी एक नाव वेगळ्या कारणामुळेही चर्चेत आलं आहे ते म्हणजे शिवम दुबे. सेमीफायनल आणि फायनलमध्ये छोटी पण धडाकेबाज खेळी करून संघाला विजयापर्यंत शिवमने पोहोचवलं.

विश्वचषकाच्या फायनलनंतर दुबे ट्रेनने प्रवास करताना दिसला. करोडो रुपये कमावणारा क्रिकेटपटू इतक्या साधेपणाने प्रवास करत असल्याने सोशल मीडियावर त्याची चर्चा झाली. आता मात्र तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, पण यावेळी कारण आहे मुंबईतील त्याची मालमत्ता.

अहवालांनुसार, शिवम दुबेने मुंबईत गेल्या वर्षीच कोट्यवधी रुपयांचे दोन फ्लॅट खरेदी केले आहेत. जून २०२५ मध्ये मुंबईतील ओशिवरा परिसरामध्ये हे फ्लॅट घेतले आहेत. या दोन्ही फ्लॅटची एकत्रित किंमत तब्बल २७.५० कोटी रुपये असल्याचं समोर आलं आहे.

हे दोन्ही फ्लॅट DLH Enclave या प्रोजेक्टमध्ये आहेत. हा प्रोजेक्ट देव लँड अँड हाऊसिंग लिमिटेड या कंपनीचा आहे. रजिस्ट्रेशनशी संबंधित कागदपत्रांनुसार, हे दोन्ही फ्लॅट एकाच इमारतीत आहेत. त्यापैकी एक फ्लॅट १७व्या मजल्यावर तर दुसरा १८व्या मजल्यावर आहे. या दोन्ही फ्लॅटचा आकार सुमारे ९६०० स्क्वेअर फूट आहे.

या व्यवहारासाठी दुबेने मोठी स्टॅम्प ड्युटीही भरली आहे. कागदपत्रांनुसार, या फ्लॅटच्या खरेदीसाठी त्याने जवळपास १.६५ कोटी रुपये केवळ स्टॅम्प ड्युटी भरली आहे. याशिवाय सोसायटीमध्ये तीन पार्किंग स्लॉटही त्याने खरेदी केले आहेत.

शिवम दुबेची कमाई प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमधून होते. Board of Control for Cricket in India कडून त्याला प्रत्येक टी-२० सामन्यासाठी सुमारे ३ लाख रुपये मानधन मिळते. याशिवाय तो बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच्या ‘सी’ ग्रेडमध्ये आहे, ज्यामुळे त्याला वर्षाला १ कोटी रुपये मिळतात.

तसेच तो Chennai Super Kings या आयपीएल संघाचा महत्त्वाचा भाग आहे. २०२५ च्या लिलावापूर्वी चेन्नईने त्याला तब्बल १२ कोटी रुपयांना रिटेन केले होते. या मोठ्या करारानंतरच दुबेने मुंबईतील हे आलिशान फ्लॅट खरेदी केल्याचं सांगितलं जातं.

मैदानावरच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर अलीकडील टी-२० विश्वचषकात शिवम दुबेने महत्त्वाची भूमिका बजावली. सेमीफायनलमध्ये त्याने २५ चेंडूत ४३ धावांची तुफानी खेळी केली. त्यानंतर फायनलमध्ये केवळ ८ चेंडूत २६ धावा करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर नेलं. त्याच्या या छोट्या पण निर्णायक खेळींमुळे भारताने सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषकावर आपलं नाव कोरलं.

२०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या शिवम दुबेचा प्रवास सुरुवातीला चढ-उतारांनी भरलेला होता. मात्र गेल्या तीन वर्षांत त्याने टी-२० फॉरमॅटमध्ये भारतीय संघात आपली जागा मजबूत केली आहे. आयपीएलमध्येही त्याने सातत्याने चांगली कामगिरी करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ट्रेनने प्रवास करणारा आणि मुंबईत कोट्यवधींची प्रॉपर्टी खरेदी करणारा हा क्रिकेटपटू सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT