भारतीय तिरंदाज शीतल देवी. Pudhari News
स्पोर्ट्स

Asian Para Games 2026 : 'गोल्डन गर्ल' शीतल देवीचा डबल धमाका! आशियाई पॅरा गेम्समध्ये सलग दुसऱ्यांदा २ सुवर्णपदकांवर कोरले नाव

Sheetal Devi Asian Para Games 2026 gold medal : अंतिम फेरीत सिंगापूरच्या प्रतिस्‍पर्धीचा केला १४२-१३९ असा पराभव

पुढारी वृत्तसेवा

Sheetal Devi Asian Para Games 2026 gold medal : भारतीय पॅरा-तिरंदाज शीतल देवीने पुन्हा एकदा आंतरराष्‍ट्रीय व्‍यासपीठावर आपले कर्तृत्त्‍व सिद्ध केली आहे. आज (दि. २२ ऑक्‍टोबर) आयची-नागोया येथे सुरू असलेल्या २०२६ च्या आशियाई पॅरा गेम्समध्ये महिलांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात सुवर्णपदक पटकावत शीतलने सलग दुसऱ्या पर्वात दोन सुवर्णपदके जिंकण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला आहे.

वैयक्तिक सुवर्णपदकाची परंपरा राखली कायम

शीतलने ओकाझाकी चुओ सोगो पार्क मल्टीपर्पज स्क्वेअर येथे झालेल्या अंतिम फेरीत सिंगापूरच्या टिम अलिम नूर शियाहिद हिचा १४२-१३९ असा पराभव केला. या विजयासह तिने २०२३ मधील हांगझोंग येथील आपले वैयक्तिक सुवर्णपदक यशस्वीपणे कायम राखले आहे.

एक सुवर्ण, एक रौप्य आणि एकाच दिवशी डबल धमाका!

शीतलसाठी गुरुवारचा दिवस अत्यंत यशस्वी ठरला. वैयक्तिक सुवर्णपदक जिंकण्यापूर्वी तिने कंपाऊंड मिश्र सांघिक (मिक्स्ड टीम) प्रकारात तोमन कुमारच्या सोबतीने सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. याशिवाय, तिने ओडिशाची चारही अंगे गमावलेली पॅरा-आर्चरीपटू पायल नाग हिच्यासह महिलांच्या कंपाऊंड दुहेरीत रौप्यपदकही पटकावले.दोन सुवर्ण आणि एक रौप्य अशी एकूण तीन पदके जिंकत शीतलने २०२३ च्या आशियाई पॅरा गेम्समधील आपल्या कामगिरीची पुनरावृत्ती केली आहे. हांगझोंगमध्येही तिने दोन सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकून भारताची सर्वोत्तम पॅरा-खेळाडू म्हणून ओळख निर्माण केली होती.

माजी विश्वविजेत्या खेळाडूचे शानदार कमबॅक

अंतिम फेरीत सिंगापूरच्या अलिम हिने सुरुवातीला शीतलवर तगडे आव्हान उभे केले होते. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये सिंगापूरच्या खेळाडूने ४ गुणांची आघाडी घेतल्यामुळे शीतल अडचणीत आली होती. मात्र, त्यानंतर भारतीय खेळाडूने जबरदस्त पुनरागमन केले. पुढील दोन फेऱ्यांमध्ये शीतलने तब्बल सहा १०-पॉइंट्स (ज्यात तीन 'एक्स' - लक्ष्याच्या अगदी मधोमध मारलेले तीर - समाविष्ट होते) नोंदवले.या अप्रतिम कामगिरीच्या बळावर शीतलने पिछाडी भरून काढत अंतिम फेरीपूर्वी दोन गुणांची आघाडी घेतली. अंतिम आणि निर्णायक फेरीत शीतलने कमालीचा संयम राखत तीन ९-पॉइंट्सच्या मदतीने २७ गुण मिळवले. दुसरीकडे, अलिमला ९, ८ आणि ९ गुणांसह एकूण २६ गुणच घेता आले. परिणामी, शीतलने १४२-१३९ असा विजय मिळवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.काही तासांपूर्वीच तोमनसोबत मिश्र सांघिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर वैयक्तिक सुवर्णपदक जिंकत शीतलने ताणतणावाखालीही सर्वोत्तम कामगिरी करण्याची आपली क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली.

हांगझोंगची पुनरावृत्ती

२०२६ ची ही स्पर्धा चीनमधील हांगझोंग येथे २०२३ मध्ये झालेल्या ऐतिहासिक पर्वाची साक्ष देणारी ठरली. मागील पर्वात तिने महिलांच्या वैयक्तिक कंपाऊंडमध्ये आणि राकेश कुमारसोबत मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. तसेच सरितासोबत महिलांच्या संघ प्रकारात रौप्यपदक पटकावले होते.तीन वर्षांनंतर शीतलने या कामगिरीची हुबेहूब पुनरावृत्ती केली असून, यंदा वैयक्तिक व मिश्र सांघिक सुवर्णपदकासह पायल नागसोबत दुहेरीत रौप्यपदक मिळवले. या भारतीय जोडीने दुहेरीच्या रँकिंग फेरीत अव्वल स्थान मिळवले होते, मात्र बुधवारी झालेल्या अंतिम फेरीत चीनच्या शुईकिंग शू आणि जिग झाओ यांच्याकडून त्यांना १४१-१५० असा पराभव स्वीकारावा लागला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT