स्पोर्ट्स

वॉर्न नावाचे वादळ थंडावले

Shambhuraj Pachindre

सिडनी : वृत्तसंस्था

महान फिरकीपटू व ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू शेन वॉर्न याचे हृदयविकाराच्या झटकाने अकाली निधन झाले. वादळासारखे आयुष्य जगलेल्या वॉर्नला वयाच्या 52 वर्षीय जीवनाच्या मैदानातून माघार घ्यावी लागली आहे. त्याच्या जाण्याने क्रिकेट विश्वाला मोठा धक्का बसला आहे. त्याने आपल्या फिरकीने अवघ्या विश्वाला एकप्रकारे मैदानावर नाचवले. त्याच्या काळातल्या अनेक दिग्गज फलंदाजांच्या मनात त्याने धडकी भरवली होती. आजही त्याने घेतलेले बळी चाहत्यांना आठवतात. मैदानासह मैदानाच्या बाहेरही तो नेहमी चर्चेत राहणारी व्यक्ती ठरला होता.

मनगटाच्या जादूने आपल्या काळातील जवळपास सर्वच दिग्गजांना त्याने आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. वॉर्नने त्याच्या 145 सामन्यांच्या कसोटी कारकिर्दीत 708 बळी घेतले. त्याने 194 एकदिवसीय सामने खेळले व यात त्याने 293 बळी घेतले. वॉर्नने आपल्या फिरकीच्या जोरावर क्रिकेट विश्व गाजवले होते. पण आशिया खंडात, खासकरून भारतामध्ये वॉर्नची जादू जास्त दिसली नाही. शेन वॉर्न आणि सचिन तेंडुलकर यांच्यात मैदानातील युद्ध चांगलेच रंगलेले पाहायला मिळायचे आणि यामध्ये सचिननेच जास्तवेळा बाजी मारल्याचे पाहायला मिळाले. वॉर्नकडे नेतृत्व करण्याची चांगली क्षमता होती आणि ते त्याने आयपीएलमध्येही दाखवून दिले.

पहिल्याच आयपीएलमध्ये आपल्या नेतृत्वाखाली वॉर्नने राजस्थान रॉयल्सला जेतेपद पटकावून दिले होते. एक कर्णधार आणि मार्गदर्शक कसा असावा, याचा उत्तम वस्तुपाठ वॉर्नने यावेळी दाखवला होता. वॉर्नने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावरही तो राजस्थानच्या संघाशी संलग्न होता. वॉर्नचे मैदानाबाहेरचे किस्सेही चांगलेच रंगल्याचे पाहायला मिळाले होते. बर्‍याच ललनांबरोबरचे त्याचे संबंध असल्याचेही म्हटले गेले. विशेषत: अभिनेत्री एलिझाबेथ हर्ले हिच्याबरोबरचे संबंध चर्चेत राहिले होते. पण त्याने कसलीही तमा बाळगली नाही. मैदानाबाहेरच्या वॉर्नच्या बर्‍याच गोष्टी प्रकाशझोतात आल्या.

पण त्यामुळे त्याची कुप्रसिद्धी कधीही झाली नाही. कारण वॉर्नने क्रिकेटच्या मैदानात बरेच नाव कमावले होते. दक्षिण आफ्रिकेत 2003 साली झालेल्या विश्वचषकातून वॉर्नला वगळण्याची पाळी ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळावर त्यावेळी आली होती. पण त्यानंतरही वॉर्न हा मैदानात आपली चुणूक दाखवतच राहिला होता.

वॉर्नचे ते शेवटचे ट्विट

शेन वॉर्नच्या बाबतीत एक विचित्र बाब म्हणजे त्याने जे शेवटचे ट्विट केले, ते एका माजी क्रिकेटरच्या मृत्यूचे होते. मरॉड मार्श गेल्याची बातमी ऐकून दुःख झाले. तो एक महान खेळाडू होता आणि अनेक युवा खेळाडूंसाठी तो प्रेरणास्रोत होता. रॉड याला क्रिकेटची खूप काळजी होती आणि त्याने क्रिकेटमध्ये खूप योगदान दिले. त्याच्या आत्म्यास शांती लाभो, असे ट्विट शेन वॉर्नने निधनाच्या 12 तास आधी केले होते. पण दुर्दैव म्हणजे, त्याच सायंकाळी शेन वॉर्नचे दु:खद निधन झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT