Shafali Verma pudhari photo
स्पोर्ट्स

Shafali Verma: वर्ल्डकप संघातून वगळलं... सेमी फायनलपूर्वी नशीब पालटलं... शफालीनं फायनलमध्ये धमाका करत जग जिंकलं

लेडी सेहवाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शफाली वर्मानं अत्यंत कमी वयात भारतीय महिला क्रिकेट संघात स्थान मिळवलं होतं मात्र...

Anirudha Sankpal

Shafali Verma Dropped From 15-member World Cup squad:

महिला वनडे वर्ल्डकप फायनलमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघानं दक्षिण अफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करत इतिहास रचला. भारतानं पहिल्यांदाच वनडे वर्ल्डकप जिंकण्याचा पराक्रम केला. भारतानं फायनल जिंकण्यात सलामीवीर शफाली वर्माच्या ८७ धावांच्या धडाकेबाज खेळीचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळं प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार शफालीला देण्यात आला. मात्र हीच शफाली दोन सामन्यापूर्वी भारतीय वनडे वर्ल्डकपच्या १५ च्या संघात देखील नव्हती. आज ती संपूर्ण भारतीयांच्या गळ्यातील ताईत झाली आहे.

लेडी सेहवाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शफाली वर्मानं अत्यंत कमी वयात भारतीय महिला क्रिकेट संघात स्थान मिळवलं होतं. तिच्या डॅशिंग फलंदाजीमुळं तिला लेडी सेहवाग म्हटलं जाऊ लागलं. फिअरलेस गेम हा तिचा युएसपी होता. मात्र जसं सेहवागच्या कामगिरीतील सातत्याची चर्चा होत होती. त्याच प्रमाणं शफालीच्या कामगिरीच्या सातत्याची सतत चर्चा असते.

शफालीच्या गुणवत्तेबाबत कोणालाही शंका नव्हती. मात्र तिच्याकडून सातत्यपूर्ण खेळी होत नव्हती. त्यामुळंच तिला संघातील स्थान गमवावं लागलं. यंदाचा महिला वनडे वर्ल्डकप भारतात होत असला तरी शफाली मात्र हा वर्ल्डकप टीव्हीवरूनच पाहणार होती किंवा पाहत होती.... तिला भारताच्या अंतिम १५ च्या संघात स्थान मिळालं नव्हतं.

स्टँड बाय मध्येही स्थान नाही...

शफालीची वर्ल्डकप खेळण्याची संधी हुकली होती. इतकंच काय स्टँड बाय खेळाडूंमध्येही तिचं नाव नव्हतं. ज्यावेळी भारतीय संघाची घोषणा झाली त्यावेळी शफालीचं नाव संघात नाही याचं अनेकांना आश्चर्य वाटलं होतं. मात्र म्हणतात ना ज्याचं नशीब बलवत्तर त्याचं कोणीही काहीही वाकडं करू शकत नाही.

जरी शफालीचं नाव १५ च्या संघात नसलं तरी नियतीनं तिचं नाव फायनलच्या प्लेअर ऑफ द मॅचच्या ट्रॉफीवर कोरलं होतं. ती महिला वनडे वर्ल्डकपच्या फायनमध्ये सर्वाधिक धावा करणारी भारतीय महिला फलंदाज ठरणार होती. ती १४० कोटी भारतीयांना जल्लोष करण्याची संधी देण्यात अग्रेसर राहणार होती.

संघातील स्थान गमावलं

शफाली ही भारताकडून सर्वात तरूण वयात टी २० क्रिकेटमध्ये पदार्पण करणारी क्रिकेटपटू ठरली होती. त्यानंतर आपल्या धडाकेबाज फलंदाजीनं शफालीनं सर्वांचीच मनं जिंकून घेतली. तिच्या या बेदरकार फलंदाजीचे अनेकजण चाहते झाले. मात्र जसजशी सामन्यांची संख्या वाढली. ज्युनिअरपासून ती सिनिअर क्रिकेटपटू झाली तसतसं तिचा खेळातील बेदरकारपणा तिचा शत्रू बनू लागला. आता तिच्याकडून कामगिरीत सातत्याची अपेक्षा वाढत होती. मात्र शफालीची कामगिरी निराशाजनक होत होती. त्यातच तिचं संघातील स्थान गेलं.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये घाम गाळला

त्यानंतर शफाली मर्यादित षटकांच्या सामन्यातील आपलं स्थान परत मिळवण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये घाम गाळू लागली. ती आपल्या फलंदाजीतील लय तिथं शोधत होती. तिला त्याचं फळ मिळालं. टी २० संघात तिनं पुनरागमन केलं. मात्र वनडे संघाचा विचार केला तर तिच्यासाठी अजून संघाची दारं बंदच होती.

मात्र शफालीचं हे नशीब भारतानं सेमी फायनलमध्ये प्रवेश केला तेव्हापासूनच पालटायला सुरू झालं. भारतीय संघात निवडली गेलेली सलामीवीर प्रतिक्षा रावळला स्पर्धेदरम्यान दुखापत झाली. त्यानंतर कुठंच पिक्चरमध्ये नसलेल्या शफलीसाठी टीम इंडियाची दारं उघडली.

ती संघात परतली त्यावेळी टीम इंडिया सेमी फायनलमध्ये पोहचली होती. आता टेन्शनवाले सामने सुरू झाले होते. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात शफालीला फारशी चमक दाखवता आली नाही. मात्र फायनलमध्ये तिनं धमाकेदार खेळी करून शफालीनं आपण मोठ्या सामन्यासाठीत बनलो आहोत हे दाखवून दिलं. तिचा फिअरलेसपणा फायनलमध्ये टीम इंडियाच्या कामी आला. या सर्वांबाबत शफाली म्हणते हा सगळा नशिबाचा खेळ. देवानं मला काहीतरी चांगलं करण्यासाठी पाठवलं आहे. ते आज दिसलं. आम्ही शेवटी वर्ल्डकप जिंकला याचा मला खूप आनंद आहे.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT