पुढारी ऑनलाईन डेस्क
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris 2024 Olympics) ओव्हरवेटमुळे भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) हिला बुधवारी (दि.७) अपात्र ठरविण्यात आले. यामुळे तिचे ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न भंगले. यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे गुरुवारी (दि.८) विनेशने कुस्तीला अलविदा केला. दरम्यान, विनेशने ५० किलो गटाच्या अंतिम फेरीत अपात्र ठरवल्याच्या निर्णयाविरोधात कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स (Court of Arbitration for Sports) कडे अपील केले आहे. दरम्यान, एका महत्त्वपूर्ण घडामोडीत, अनेकवेळा विनंती केल्यानंतर ज्येष्ठ वकील हरीश साळवे (senior advocate Harish Salve) यांनी क्रीडा लवादाच्या न्यायालयात विनेश फोगाटची बाजू मांडण्याचे मान्य केले आहे. यावर आज शुक्रवारी (दि.९) स्थानिक वेळेनुसार सकाळी ९.३० वाजता (भारतीय वेळेनुसार दुपारी १ वाजता) सुनावणी होणार आहे.
भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (IOA) सीएएससमोर विनेश फोगाटच्या अपीलसाठी वकील नियुक्त करण्यासाठी अतिरिक्त वेळ मागितला होता. विनेशने तिच्या अपात्रतेविरुद्ध दोन मुद्द्यांवर अपील केले आहे. पहिले म्हणजे तिला पुन्हा वजन करायचे होते, पण त्यासाठी परवानगी नाकारण्यात आली. यामुळे सुवर्णपदकाचा सामना नियोजित वेळेनुसार पुढे गेला. दुसरे अपील म्हणजे आपल्याला रौप्यपदक मिळावे, अशी मागणी तिने केली आहे. कारण तिने मंगळवारी योग्य वजनासह सेमीफायनल सामना जिंकला होता. या प्रकरणी विनेशने दाखल केलेली याचिका कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्सने स्वीकारत त्यावरील सुनावणीची वेळ निश्चित केली आहे. यामुळे विनेशला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
७ ऑगस्ट रोजी ५० किलो कुस्ती गटाच्या अंतिम सामन्यापूर्वी १०० ग्रॅम जास्त वजनामुळे विनेशला अपात्र ठरवण्यात आले. यामुळे विनेशला कायदेशीर लढाईला सामोरे जावे लागत आहे. दुसऱ्यांदा वजन करण्याची तिची विनंती फेटाळण्यात आली होती. पण कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्सने तिच्या बाजूने निकाल दिल्यास दिला रौप्यपदक मिळण्याची आशा आहे. एका वृत्तानुसार, पॅरिसमधील चार वकील सध्या विनेशची बाजू मांडत आहेत. पण आता हरीश साळवे देखील विनेशची बाजू मांडणार असल्याने भारतीय ऑलिम्पिक संघटनेला योग्य न्याय मिळण्याची आशा आहे. दरम्यान, या प्रकरणाचा निकाल तात्काळ नसेल आणि त्यासाठी विलंबदेखील होऊ शकतो.
विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीतून अपात्र ठरली होती. सुवर्णपदकाच्या लढतीच्या दिवशी सकाळी तिचे वजन ५०.१ किलो होते. पात्रतेच्या निकषांपेक्षा तिचे वजन १०० ग्रॅम होते. फोगटची अपात्रता ही प्रत्येक भारतीयासाठी एक मोठा धक्का होता. सुवर्णपदकाच्या एका रात्री अगोदर विनेशने उपांत्य फेरीनंतर मिळवलेले २.७ किलो वजन कमी करण्यासाठी सराव केला. भारताचे मुख्य वैद्यकीय अधिकारी दिनशॉ पार्डीवाला यांनी स्पष्ट केले की,. पॅरिसच्या उष्णतेमध्ये सौनामध्ये वेळ घालवण्यासाठी विनेशने वजन कमी करण्यासाठी अथक परिश्रम केले होते. जेव्हा सर्व काही अयशस्वी झाले, तेव्हा प्रशिक्षकांनी तिचे केस कापण्याचा प्रयत्न केला; परंतु तरीही वजन ५० किलोग्रॅमपर्यंत पोहोचू शकले नाही. यामुळे अखेर तिला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आले.