Satwik-Chirag China Masters Title : भारताची स्टार पुरुष दुहेरी जोडी सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी अटीतटीच्या अंतिम सामन्यात जबरदस्त पुनरागमन करत चायना मास्टर्स सुपर ७५० बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. रविवारी झालेल्या तीन गेम्सच्या थरारक लढतीत भारतीय जोडीने चीनच्या हे जी टिंग आणि रेन शियांग यू या जोडीचा पराभव करत जेतेपदावर आपले नाव कोरले.
२०२३ आणि २०२५ च्या मोसमात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या सात्विक-चिरागने तिसऱ्या प्रयत्नात हे स्वप्न पूर्ण केले. १ तास १० मिनिटे चाललेल्या या महामुकाबल्यात भारतीय जोडीने माजी जागतिक ४ थ्या क्रमांकाच्या चिनी जोडीचा ११-२१, २१-१३, २१-१७ असा पराभव केला. सात्विक-चिरागचे या हंगामातील हे दुसरे विजेतेपद ठरले असून, यापूर्वी त्यांनी सिंगापूर ओपन सुपर ७५० चे विजेतेपद आणि थायलंड ओपन सुपर ५०० चे उपविजेतेपद पटकावले होते. १९ सप्टेंबरपासून जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाचा बचाव करण्यासाठी उतरण्यापूर्वी जागतिक क्रमवारीत ५ व्या स्थानावर असलेल्या या जोडीसाठी हा विजय मोठा आत्मविश्वास देणारा ठरणार आहे.
नाणेफेक जिंकून बाजू निवडणाऱ्या भारतीय जोडीची सुरुवात अत्यंत खराब झाली. चिनी जोडीने सुरुवातीलाच ५-० अशी आघाडी घेतली. हे जी टिंगच्या तुफान स्मॅश आणि आक्रमक खेळापुढे भारतीय बचाव निष्प्रभ ठरला. मध्यंतरापर्यंत ७-१४ अशी पिछाडीवर पडलेल्या सात्विक-चिरागला पहिला गेम ११-२१ असा गमवावा लागला.
दुसऱ्या गेममध्ये सात्विक-चिरागने आपल्या रणनीतीत बदल केला. त्यांनी अप्रतिम बचाव करत रॅलीज लांबवल्या. सात्विकच्या फ्लिक सर्व्ह आणि चिरागच्या बॉडी स्मॅशमुळे भारतीय जोडीने ११-७ अशी मध्यंतराला आघाडी घेतली. १२-८ च्या स्कोअरवर झालेली ४५-शॉट्सची रॅली जिंकून भारतीय जोडीने सामन्यावर पकड मजबूत केली आणि अखेर हा गेम २१-१३ ने जिंकून सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली.
निर्णायक गेममध्ये चिनी जोडीने ४-० अशी आघाडी घेतली होती, पण सात्विक-चिरागने चिकाटी दाखवत स्कोअर ७-७ असा बरोबरीत आणला. मध्यंतराला चिनी जोडी ११-९ ने पुढे होती. परंतु, १६-१६ च्या बरोबरीनंतर भारतीय जोडीने आक्रमक खेळ करत १८-१७ अशी आघाडी घेतली. त्यानंतर सात्विक-चिरागला तीन मॅच पॉईंट्स मिळाले आणि चिरागने मारलेल्या दमदार स्मॅशवर भारताने २१-१७ असा गेम जिंकत चषक आपल्या नावे केला.