Sanju Samson In CSK:
संजू सॅमसन आता धोनीच्या CSK कडून खेळणार अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. अखेर संजू सॅमसनच्या ट्रेडवर शिक्कामोर्तब झालं. सीएसकेचा रविंद्र जडेजा राजस्थानकडून खेळणार तर राजस्थानचा संजू सॅमसन हा आता चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणार आहे. यावर आता अधिकृतरित्या शिक्कामोर्तब झालं आहे.
विशेष म्हणजे संजू सॅमसननं आयपीएलमध्ये इतिहास रचला आहे. तो आतापर्यंतच्या आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा ट्रेड डीलचा भाग झाला आहे. त्यानं राजस्थान रॉयल्सचं अनेक वर्षे नेतृत्व केलं आहे. मूळचा केरळचा असलेला संजूचं आता सीएसके नवं घर असणार आहे. संजू सॅमसन सीएसकेकडे १८ कोटी रूपयात ट्रेड झाला आहे. तर रविंद्र जडेजा आणि सॅम करून अनुक्रमे १४ कोटी आणि २.४ कोटी रूपये मोजून हे राजस्थानकडं जाणार आहेत.
दरम्यान, संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्सची टीम सोडताना एक भावनिक पोस्ट केली. त्यानं फ्रेंचायजीला आपण सर्वस्व दिल्याचं सांगितलं. त्यानं फ्रेंचायजीमध्ये आपण सर्वांना एका कुटुंबाप्रमाणं वागवल्याचंही सांगितलं.
संजू आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, 'आम्ही इथं फक्त काही काळासाठी आहे. मी या फ्रेंचायजीला माझं सर्वस्व दिलं. खूप चांगलं क्रिकेट अनुभवलं. काही जन्मभराची नाती जोडली. मी या फ्रेंचायजीमध्ये सर्वांना एका कुटुंबाप्रमाणं मानलं.... आणि आता वेळ झाली आहे. मी मूव्ह ऑन करतोय. इथं जे काही मिळालं त्यासाठी खूप कृतज्ञ राहीन.'
संजू सॅमसन हा आयपीएल २०२५ चा हंगाम संपल्यानंतरच त्याला रिलीज केलं जावं यासाठी प्रयत्नशील होता. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात अनेकवेळा या ट्रेडसाठी चर्चा झाली. मात्र गेल्या काही आठवड्यात त्याला वेग आला. त्यानंतर सॅमसन आणि जडेजा, करन यांच्याकडून त्यांची सहमती घेण्यात आली. यानंतरच बीसीसीआयला याबाबत कळवण्यात आलं अन् या ट्रेडवर अधिकृत शिक्कामोर्तब झालं.
संजू सॅमसनने २०१३ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून आयपीएल पदार्पण केलं होत. त्यानंतर तो काही काळ दिल्ली कॅपिटल्सकडे गेला होता. त्यानंतर तो परत २०१८ मध्ये पुन्हा राजस्थान रॉयल्समध्ये आला.