India West Indies match highlights BCCI viral video
सेंट लुसिया: भारतीय संघाने टी-२० विश्वचषक २०२६ च्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. सुपर-८ च्या अटीतटीच्या शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजचा पाच गडी राखून पराभव करत टीम इंडियाने सहाव्यांदा या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली. भारताच्या या ऐतिहासिक विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो म्हणजे संजू सॅमसन. मात्र, सामन्यानंतर संजूने जे केले, त्याने केवळ सामनाच नाही तर कोट्यवधी क्रीडाप्रेमींची मनेही जिंकली आहेत.
संजू सॅमसनने ५० चेंडूत ९७ धावांची वादळी नाबाद खेळी साकारली. विजयाचा चौकार मारताच संजूने खेळपट्टीवरच गुडघ्यावर बसून, हेल्मेट काढून बॅट समोर ठेवली आणि ईश्वराचे आभार मानले. डग-आउटमध्ये बसलेल्या संपूर्ण भारतीय संघाने उभे राहून संजूचे कौतुक केले. बीसीसीआयने या खास क्षणांचा व्हिडिओ आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे.
संजू सॅमसन जेव्हा मैदानातून परतत होता, तेव्हा प्रत्येक खेळाडूने त्याचे जंगी स्वागत केले. कर्णधार सूर्यकुमार यादवने तर आपली कॅप काढून संजूसमोर नतमस्तक होत त्याला मानवंदना दिली. विशेष म्हणजे, नेहमी गंभीर राहणाऱ्या मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने संजूला घट्ट मिठी मारली.
मैदानातील सेलिब्रेशननंतर जेव्हा संजू ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला, तेव्हा एक अतिशय भावूक दृश्य पाहायला मिळाले. संजू शांतपणे एका कोपऱ्यात गेला, तिथे त्याने आपल्या क्रिकेट किटसमोर गुडघे टेकले आणि हात जोडून आपल्या साहित्याला नमस्कार केला. ज्या खेळाने आपल्याला ओळख दिली, त्याबद्दलची ही कृतज्ञता पाहून संजूच्या नम्र स्वभावाचे सर्वत्र कौतुक होत आहे.