Sania Mirza on divorce : सानिया मिर्झा... भारतीय टेनिसला जागतिक ओळख मिळवून देणारी यशस्वी महिला खेळाडू...तिचा टेनिस कोर्टवरील वावर हा अत्यंत आत्मविश्वासाने भारलेला असायचा... भारतीय तरुणींसाठी ती एक प्रेरणास्थान ठरली ... जागतिक टेनिसमध्ये अनेक अटीतटींच्या सामन्यात तिने मानसिक कणखरतेच्या जोरावर विजयाकडे वाटचाल केली... मात्र हीच सानिया आपल्या वैयक्तिक आयुष्यातील एका नात्याच्या वादळापुढे पूर्णपणे खचली होती. पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकसोबतच्या घटस्फोटानंतर एका मोठ्या भावनिक धक्क्यातून गेली. आयुष्यातील त्या सर्वात वेदनादायक आणि भावनिक क्षणांपैकी एका क्षणाबद्दल सानिया मिर्झाने पहिल्यांदाच जाहीरपणे भाष्य केले आहे.
सानियाने नुकताच तिचा नवा यूट्यूब टॉक शो 'सर्व्हिंग इट अप विथ सानिया' (Serving It Up With Sania) सुरु केला आहे. पहिल्या एपिसोडमध्ये तिची पाहुणी होती बॉलीवूड दिग्दर्शिका आणि खास खास मैत्रीण फराह खान. याच शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये या दोघींनी मनमोकळ्या संवाद साधला.
यावेळी सानियाने सांगितले की, "मला कॅमेऱ्यावर याबद्दल जास्त बोलायचं नाही; पण माझ्या आयुष्यातील एका उदास आणि आव्हानात्मक प्रसंगामधून जात होते. मला भयंकर पॅनिक ॲटक आला. याचवेळी मला एका लाईव्ह शोसाठी जायचे होते. त्यावेळी तू (फराह खान) माझ्या सेटवर आलीस. जर तू तिथे आली नसती, तर मी तो शो केला नसता कारण मी थरथरत होते. तू तिथे आलीस आणि 'काहीही झाले तरी तू हा शो करायचा आहेस,' असे मला बजावले." त्या दिवसाची आठवण सांगताना फराह म्हणाली की, सानियाला इतक्या तणावात पाहून ती खूप घाबरली होती. "मी खूप घाबरले होते. मला त्या दिवशी शूटिंग करायचं होतं, पण मी सर्व काही सोडून पायजमा आणि चप्पलमध्येच धावत तिथे आले. त्या क्षणी मला फक्त तिच्या बाजूला राहायचे होते," असे फराहने सांगितले.
या संवादावेळी फराह खानने फराहने सानियाचे एकल पालकत्वाचे कौतुक केले. ती म्हणाली, "आता तुला एकटीला सर्व जबाबदारी पार पाडायची आहे. मुलाचे संगोपन करायचे आहे त्यांना वेळ द्यायचा आहे. तू अत्यंत जबाबादारीने सर्व काही पार पाडत आहेस."
सानियाने शोएब मलिकसोबत एप्रिल २०१० मध्ये लग्न केले आणि २०१८ मध्ये त्यांचा मुलगा इझान मिर्झा मलिकचा जन्म झाला. जानेवारी २०२४ मध्ये शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत दुसऱ्या लग्नाची घोषणा केल्यानंतर, लगेचच सानियाच्या कुटुंबाने दोघांच्या घटस्फोटाची बातमी जाहीर केली होती. सानियाची बहीण अनम मिर्झा हिने सानिया काही महिन्यांपूर्वीच विभक्त झाली होती, असे सांगत या संवेदनशील काळात गोपनीयता पाळण्याची विनंती केली होती.