

Haris Rauf opens up on criticism : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हरिस रौफ यांच्या भावनांचा बांध मंगळवारी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातील रोमहर्षक विजयानंतर फुटला. मागील काही वर्ष सातत्याने भारतीय फलंदाजांनी धुलाई केलेल्याने रौफ सातत्याने टीकेचा धनी होत होता. त्याने टीकाकारांना प्रत्युत्तर देत खेळाडूंकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याचे आवाहन पाकिस्तानी चाहत्यांना केले.
रौफ याची आशिया चषकातील कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. विशेषतः भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने फक्त ३.४ षटकांत ५० धावा दिल्या आणि तो सामन्यातील पाकिस्तानचा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याच स्पर्धेत आक्षेपार्ह हावभाव केल्याबद्दल दोन सामन्यांच्या निलंबनाची शिक्षाही त्याला झाली होती.
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात रौफने चार बळी घेत पाकिस्तानला रोमहर्षक विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत भावनिक झालेल्या रौफ म्हणाला की, "आमच्यासाठी कोणतेही माफी नसते. आम्ही रोबोट (यंत्रमानव) सारखी कामगिरी करण्याची अपेक्षा असते; पण आम्ही माणसे आहोत आणि आमचा दिवस खराब असू शकतो. एखादा दिवस खराब असल्याने मृत्यू येत नाही. सर्वोत्तम फ्लॅनिंग केले तरी एखादा दिवस सारं काही बिघडू शकते. आम्ही आमच्या कौशल्यावर विश्वास ठेवतो आणि चुका सुधारण्यासाठी काम करत राहतो. कोणत्याही गोलंदाजाचा दिवस खराब असू शकतो. व्यावसायिक क्रिकेटपटू म्हटलं की याला सामोरे जावे लागतेच."
“कोणत्याही खेळाडूला टीका आवडत नाही. तुम्ही कदाचित १० चांगले सामने खेळता आणि एक खराब सामना, तरीही सगळ्यांना फक्त तो एक खराब सामनाच आठवतो. आम्ही प्रत्येक वेळी आमचे सर्वोत्तम प्रयत्न करतो, यावर चाहत्यांनी कधीही शंका घेऊ नये.कोणत्याही सामन्यात क्रिकेटपटू करत असलेल्या प्रयत्नांची दखल घ्यावी, असे आवाहनही रौफ याने केले.
पाकिस्तानने रावळपिंडी येथे झालेल्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेवर सहा धावांनी विजय मिळवला. तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. ३०० धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेने ८० धावांच्या सलामी भागीदारीमुळे चांगली सुरुवात केली होती, पण मधल्या षटकांमध्ये त्यांनी झटपट विकेट्स गमावल्या. यासामन्यात हरिस रौफने ६१ धावा देत ४ बळी घेतले. त्याने पाथुम निसंका आणि कामिल मिशारा यांची ७० चेंडूंमध्ये ८५ धावांची सलामी भागीदारी ब्रेक केली.