Sai Sudharsan IPL 2026 GT vs RR
नवी दिल्ली: आयपीएलच्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय मिळवत गुजरात टायटन्सने अंतिम फेरीत धडक मारली. मात्र या विजयाइतकीच चर्चा झाली ती गुजरातचा सलामीवीर साई सुदर्शनच्या अनोख्या बाद होण्याची. एकदा 'हिट विकेट' बाद होणे हे दुर्दैव मानले जाऊ शकते; पण दोनदा, आणि तेही सलग दोन सामन्यांमध्ये, असे घडणे मात्र अत्यंत विचित्र आहे. बी. साई सुदर्शन त्याच्या टी-20 कारकिर्दीत आतापर्यंत तीन वेळा 'हिट विकेट' बाद झाला आहे. विशेष म्हणजे, टी-20 कारकिर्दीत तिसऱ्यांदा हिट विकेट होत त्याने एका नकोशा विक्रमाची बरोबरी केली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या पहिल्या क्वालिफायरमध्ये साई सुदर्शन दमदार फलंदाजी करत होता. मात्र जेकब डफीच्या चेंडूवर फटका मारताना त्याच्या हातातून बॅट निसटली आणि ती थेट स्टंपवर आदळली. त्यामुळे तो हिट विकेट बाद झाला. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या दुसऱ्या क्वालिफायरमध्येही जवळपास तसाच प्रकार घडला. 215 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सुदर्शनने 32 चेंडूत 58 धावांची झंझावाती खेळी केली. शुभमन गिलसोबत त्याने भक्कम सलामी भागीदारी उभारली होती. मात्र बृजेश शर्माच्या चेंडूवर खेळताना त्याच्या हातातून पुन्हा बॅट सुटली आणि थेट स्टंपवर जाऊन आदळली. हा प्रकार पाहून सुदर्शनच नव्हे तर नॉन-स्ट्रायकर एंडवरील शुभमन गिलही अवाक झाला.
सामन्यानंतर सुदर्शनने आपल्या या विचित्र बाद होण्यावर विनोदी प्रतिक्रिया दिली. "आता काहीतरी वेगळे करून पाहावे लागेल. कदाचित 'ग्रिप टेक' वापरून पाहीन आणि काही चेंडू खेळून पाहीन. खरं सांगायचं तर हे नेमकं कसं घडलं, याचं उत्तर माझ्याकडेही नाही," असे तो म्हणाला.
2022 मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुदर्शन पहिल्यांदा हिट विकेट झाला होता. टी-20 क्रिकेटमध्ये तीन वेळा हिट विकेट होणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आता त्याचे नाव आंद्रे रसेल आणि शोएब मलिक यांच्या बरोबरीने आले आहे. या घटनेवर बोलताना सुदर्शन म्हणाला, "मागील सामन्यात बॅट काही वेळा उड्या मारत स्टंपवर लागली होती. पण यावेळी ती थेट स्टंपवरच जावी, अशीच बहुधा माझी इच्छा असावी."
दरम्यान, सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी 167 धावांची भागीदारी करत गुजरातच्या विजयाचा पाया रचला. या मोसमात दोघांनी मिळून चार शतकी भागीदाऱ्या केल्या असून दोघांच्याही धावसंख्येने 700 चा टप्पा ओलांडला आहे. सुदर्शनसोबतच्या यशस्वी भागीदारीबद्दल बोलताना गिल म्हणाला, "आम्ही एकमेकांचा खेळ खूप चांगल्या प्रकारे समजून घेतो. मैदानावरील संवादही उत्कृष्ट असतो. कोणत्या गोलंदाजावर कोण आक्रमण करणार, याचा निर्णय आम्ही सहजपणे घेतो."
तर सुदर्शननेही गिलसोबतची जोडी वर्षानुवर्षे अधिक मजबूत होत गेल्याचे सांगितले. "गुजरात टायटन्ससोबतच्या सुरुवातीच्या काही हंगामांत मला खूप शिकायला मिळाले. अजूनही माझ्या खेळात सुधारणा करण्यासाठी अनेक गोष्टी आहेत. त्यावर मेहनत घेऊन आणखी चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करेन," असे सुदर्शनने सांगितले.