स्पोर्ट्स

Ruturaj Gaikwad Century : ऋतुराज गायकवाडचे दमदार शतक! टीम इंडियातून बाहेर असूनही प्रभावी कामगिरी

ऋतुराजने जरी आपल्या संघासाठी शतक झळकावले असले, तरी तो या स्पर्धेतील पुढील सामना खेळण्याची शक्यता कमी आहे.

रणजित गायकवाड

Ruturaj Gaikwad Buchi Babu tournament century

भारतीय क्रिकेट संघातून बाहेर असलेल्या ऋतुराज गायकवाडने बूची बाबू स्पर्धेत दमदार शतक झळकावले आहे. भारतीय क्रिकेटमध्ये सध्या आगामी आशिया चषक स्पर्धेची तयारी सुरू आहे, ज्यासाठी संघाची घोषणाही झाली आहे. सध्या भारतीय खेळाडू सामने खेळत नसल्याने, बूची बाबू स्पर्धेची जोरदार चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीत, संघातून बाहेर असलेल्या ऋतुराज गायकवाडने आणखी एक शतक झळकावून बीसीसीआयच्या निवड समितीचे लक्ष वेधून घेतले आहे. महाराष्ट्राकडून खेळताना त्याने हिमाचल प्रदेशविरुद्ध ही शतकी खेळी केली.

पहिल्या सामन्यातील अपयशानंतर ऋतुराजचे शानदार पुनरागमन

बूची बाबू स्पर्धेतील पहिल्या सामन्यात ऋतुराजने दोन लहान खेळी खेळल्या होत्या, परंतु दुसऱ्या सामन्यात त्याला वगळण्यात आले. तिसऱ्या सामन्यात परतल्यावर त्याने दमदार शतक झळकावले. छत्तीसगडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने पहिल्या डावात १ तर दुसऱ्या डावात ११ धावा केल्या होत्या. त्यानंतर या सामन्यात जेव्हा तो फलंदाजीला आला, तेव्हा संघाची धावसंख्या केवळ ६४ होती. त्यानंतर त्याने सूत्रे हाती घेतली आणि संघाला चांगल्या स्थितीत पोहोचवले.

ऋतुराज गायकवाडने जरी आपल्या संघासाठी शतक झळकावले असले, तरी तो या स्पर्धेतील पुढील सामना खेळण्याची शक्यता कमी आहे. दुलीप करंडक स्पर्धेसाठी त्याची निवड झाली असून, तो लवकरच पश्चिम विभागाकडून खेळताना दिसेल. या स्पर्धेपूर्वी तो फॉर्ममध्ये येणे हा एक चांगला संकेत आहे. जर दुलीप करंडक स्पर्धेतही त्याने चांगली कामगिरी केली, तर त्याचे भारतीय संघात पुनरागमन होण्याची शक्यता वाढेल.

गेल्या आयपीएलमध्ये दुखापत

ऋतुराज गायकवाड जरी भारतीय संघाचा भाग नसला तरी, आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार आहे. गेल्या हंगामात दुखापतीमुळे त्याला स्पर्धेतून मध्येच बाहेर पडावे लागले होते. त्यानंतर, महेंद्रसिंग धोनीने संघाची धुरा सांभाळली होती. संघाची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. आता भविष्यात तो जेव्हा मैदानात उतरेल, तेव्हा अशीच चांगली कामगिरी तो कायम राखतो का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. त्यामुळे त्याच्यावर सर्वांचे लक्ष असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT