रोहित शर्मा, विराट कोहली. File Photo
स्पोर्ट्स

Rohit-Virat : रोहित-विराटला विजय हजारे ट्रॉफीत खेळावेच लागले! BCCIच्या आदेशावर रोहित काय म्हणाला?

देशांतर्गत क्रिकेट स्‍पर्धेतील सहभागाबाबत विराट कोहलीच्या भूमिकेबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता

पुढारी वृत्तसेवा

Rohit Sharm on Vijay Hazare Trophy

मुंबई : भारतीय संघाचे स्टार फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही टीम इंडियाच्या वन-डे संघातील आधारस्तंभ आहेत. दोघांनी कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेत आपले सर्व लक्ष वन-डे फॉर्मेटवर केंद्रित केले आहे. मात्र, टीम इंडियाकडून खेळायचे असल्यास देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणे अनिवार्य असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्पष्ट केले आहे. यामुळेच आता दक्षिण आफ्रिका वन-डे मालिकेसाठी विजय हजारे ट्रॉफीमधील दोघांचा सहभाग चर्चेचा विषय ठरला आहे. याबाबत विराटने मौन बाळगले असले तरी रोहित शर्माने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

बीसीसीआयचा आदेश काय?

भारतीय संघात निवडीसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना देशांतर्गत क्रिकेट खेळावेच लागेल, कारण दोघेही कसोटी आणि टी-२० फॉरमॅटमधून निवृत्त झाले आहेत. त्यामुळे त्यांना सामन्यात तंदुरुस्त राहण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत खेळावे लागले, असे वृत्त 'इंडियन एक्स्प्रेस'ने बीसीसीआय सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताच्या निराशाजनक कामगिरीनंतर बीसीसीआयने असेच निर्देश दिले तेव्हा कोहली आणि रोहित दोघेही रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी परतले आणि त्यांनी प्रत्येकी एक सामना खेळला होता.

रोहित शर्माने स्पष्ट केली भूमिका

विजय हजारे ट्रॉफीमध्ये सहभागी होणार असल्याचे यापूर्वीच रोहित शर्माने मुंबई क्रिकेट असोसिएशनला कळवले आहे. तर विजय हजारे ट्रॉफी २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. तसेच तो २६ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेतही संघाकडून खेळण्यास सज्ज आहे. दरम्यान, विराट कोहलीने अद्याप देशांतर्गत एकदिवसीय स्पर्धेतील सहभागाबाबत स्थिती स्पष्ट केलेली नाही. आता २०२७ च्या भारताच्या एकदिवसीय विश्वचषक संघातील सहभागासाठी दोन्ही खेळाडूंना देशांतर्गत स्पर्धेत खेळावे लागेल.

देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील सहभागासाठी बीसीसीआय आग्रही

काही काळापूर्वीच बीसीसीआय निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी टीम इंडियात निवड होण्यासाठी खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळणे महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले होते. आगरकर म्हणाले होते की, “आम्ही एक किंवा दोन वर्षांपूर्वीच स्पष्ट केले होते की, टीम इंडियातील खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळले पाहिजे. तुमच्याकडे पुरेसा ब्रेक असेल तर क्रिकेट खेळण्याचा हा एकमेव मार्ग आहे. खेळाडू मोकळे असतील तर त्यांनी देशांतर्गत क्रिकेट खेळले पाहिजे.”

विराट-रोहितच्या कामगिरीवरच सर्वाधिक चर्चा

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या समाप्तीनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत हे दोघे पहिल्यांदाच राष्ट्रीय संघात परतले. या मालिकेत रोहितने एक अर्धशतक आणि एक शतक ठोकत सामनावीराचा पुरस्कार पटकावला. दुसरीकडे, कोहलीने मालिकेतील शेवटच्या सामन्यात त्याच्या क्षमतेनुसार ७४ धावांची खेळी केली. आता केवळ वन-डे फॉर्मेटमध्ये खेळत असणाऱ्या विराट आणि रोहितच्या फॉर्मकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. या दोघांच्या कामगिरीवरच सर्वाधिक चर्चा सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT