Rohit Sharma World Cup 2027 : एकदिवसीय २०२७ विश्वचषक स्पर्धेतील आपल्या सहभागाबाबत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या तर्कवितर्कांना भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज रोहित शर्माने अखेर पूर्णविराम दिला आहे. "ऑक्टोबर २०२७ अजून खूप दूर आहे, त्यावेळी काय करायचे ते नंतर पाहू," अशा एकाच वाक्यात उत्तर देत रोहितने यावर अधिक भाष्य करणे टाळले.
मुंबईत आयोजित 'ग्लोबल फिनटेक फेस्ट'दरम्यान उपस्थितांपैकी एकाने त्याला २०२७ च्या विश्वचषकात खेळण्याबाबत प्रश्न विचारला असता त्याने हे विधान केले. टी-२० आणि कसोटी मालिकेतून निवृत्ती घेतल्यानंतर रोहितच्या भविष्यातील कारकिर्दीबाबत चर्चा रंगल्या होत्या. अशातच त्याच्या या संक्षिप्त प्रतिक्रियेने क्रीडा जगताचे लक्ष वेधून घेतले आहे. २०२७ चा एकदिवसीय विश्वचषक दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्या संयुक्त यजमानपदाखाली पार पडणार आहे.
२०२४ मध्ये वेस्ट इंडिजमध्ये टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर मुंबईत जशी बसमधून भव्य विजय मिरवणूक काढण्यात आली होती, तशीच मिरवणूक पुन्हा पाहायला मिळेल का, असा प्रश्नही त्याला विचारण्यात आला. यावर उत्तर देताना, "मला नाही वाटत की आता पुन्हा तशी बस मिरवणूक शक्य होईल," असे रोहितने स्पष्ट केले.
बीसीसीआयचे सचिव देवाजित सायकिया यांनी रोहित शर्माच्या फॉर्मवर आणि भवितव्यावर भाष्य करत सर्व अफवा फेटाळून लावल्या आहेत. "रोहित उत्कृष्ट लयीत आहे आणि प्रत्येक सामन्यात शानदार फलंदाजी करत आहे. मग तर्कवितर्क कशासाठी? नुकत्याच झालेल्या सामन्यात त्याने १३८ धावांची शतकी खेळी केली आहे. त्यामुळे या चर्चांना उधाण देण्याचे काहीही कारण नाही," असे सायकिया यांनी स्पष्ट केले.