न्यूझीलंडचा दौर्‍यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीची कामगिरी निराशाजनक राहिली. File Photo.
स्पोर्ट्स

India vs New Zealand :वनडे वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाची चिंता वाढली ! विराट आणि रोहितची न्यूझीलंडमधील अखेरची खेळीही ठरली अपयशी

Rohit Sharma Virat Kohli ODI Form : न्यूझीलंडचा दौरा विराटसह रोहितसाठी एका दुस्वप्नासारखाच ठरला

पुढारी वृत्तसेवा

Rohit Sharma Virat Kohli ODI Form : न्यूझीलंडचा दौरा भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांच्यासाठी एका दुस्वप्नासारखा ठरला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर न्यूझीलंडला पोहोचलेल्या रोहितकडून चाहत्यांना खूप अपेक्षा होत्या; मात्र, पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत चार डावांत त्याला केवळ ३० धावा करता आल्या. दोन डावात तर तो खातेही उघडू शकला नाही. दुसरीकडे, विराट कोहलीने चार डावांत २१.५० च्या सरासरीने ८६ धावा केल्या. त्याने एक अर्धशतक झळकावले असले तरी, पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर त्याला कोणतीही मोठी खेळी करता आली नाही. या दोन अनुभवी फलंदाजांच्या कामगिरीमुळे २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाची चिंता वाढली आहे.

रोहितची बॅट शांतच

रोहित शर्मासाठी न्यूझीलंड मालिका अत्यंत खराब ठरली. ४ नोव्हेंबर रोजी ऑकलंडमध्ये झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात तो शून्यावर बाद झाला. ७ नोव्हेंबर रोजी वेलिंग्टनमध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात त्याने २३ धावा केल्या. १० नोव्हेंबर रोजी हॅमिल्टनमध्ये होणारा तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला, ज्यामुळे रोहितला फलंदाजीची संधी मिळाली नाही.१३ नोव्हेंबर रोजी माउंट मौनगानुई येथे झालेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात रोहित पुन्हा एकदा शून्यावर बाद झाला. मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात तो केवळ सात धावा करू शकला. परिणामी, चार डावांत मिळून त्याने केवळ ३० धावा केल्या आणि संपूर्ण मालिकेत त्याला एकही अर्धशतक झळकावता आले नाही.

विराट कोहलीनेही केली चाहत्‍यांची निराशा

पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर विराट कोहलीची कामगिरीही निराशाजनक राहिली. ऑकलंडमधील पहिल्या सामन्यात त्याने ५१ चेंडूत ७४ धावांची शानदार खेळी केली. या खेळीत त्‍याने १३ चौकार आणि एक षटकार फटकावला. मात्र, त्यानंतर त्याचा फॉर्म हरवला. त्यानंतरच्या दोन पूर्ण सामन्यांत तो अनुक्रमे केवळ सात आणि पाच धावाच करू शकला. विराटने एकूण चार डावांत ८६ धावा केल्या, ज्यामध्ये त्याची सरासरी २१.५० आणि स्ट्राईक रेट १२४.६४ राहिला. त्याने एक अर्धशतकही नोंदवले.

विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर फॉर्मबद्दल प्रश्नचिन्ह

न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांची कामगिरी निराशाजनक राहिली. रोहितने चार डावांत ३० धावा केल्या, तर विराटने ८६ धावा केल्या. या दोन अनुभवी फलंदाजांच्या अपयशामुळे २०२७ च्या विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या फॉर्मबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. डिसेंबरमध्ये श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेत त्यांना पुनरागमन करण्याची संधी मिळेल.

२०२७ विश्वचषकाच्या तयारीला धक्का?

आता २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाची तयारी एका निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये आयोजित होणाऱ्या या स्पर्धेतील खेळपट्ट्या किंवा परिस्थिती काही प्रमाणात न्यूझीलंडमधील परिस्थितीसारखीच असू शकते. अशा परिस्थितीत, या दोन अनुभवी फलंदाजांचा संघर्ष भारतीय संघासाठी चिंतेची बाब ठरत आहे. चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली. ३३४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ अवघ्या ८९ धावांत सर्वबाद झाला. संघाला २४४ धावांच्या मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी संघाच्या कामगिरीवर चिंता व्यक्त केली. न्यूझीलंडमधील परिस्थिती ही पुढच्या वर्षी होणाऱ्या विश्वचषकातील अपेक्षित परिस्थितीशी मिळतीजुळती असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

रोहितच्या बाजूने भक्कम आकडेवारी

अलीकडील कामगिरी पाहता, रोहितच्या एकदिवसीय (ODI) क्रिकेटमधील एकूण क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे घाईचे ठरेल. २०२३ च्या विश्वचषकानंतर,रोहित शर्मा हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. यामध्‍ये इंग्लंडविरुद्धच्या १३८ धावा, वेस्ट इंडिजविरुद्धच्या १०१ आणि ९२ धावांचा खेळीचा समावेश आहे. न्यूझीलंड दौऱ्याच्या अगदी आधी रोहित चांगल्या लयीत होता. त्यामुळे, सध्याच्या खराब कामगिरीला त्याच्या कारकिर्दीचा अंतिम निकाल मानले जाऊ शकत नाही. असे असले तरी, सलग अपयशांमुळे त्याच्या फॉर्मबद्दल आणि भविष्याबद्दल नक्कीच प्रश्न निर्माण झाले आहेत.

दोघानांही श्रीलंका मालिकेतील पुनरागमनाची संधी

रोहित आणि विराट यांना मायदेशात पुन्हा एकदा आपली लय मिळवण्याची संधी मिळणार आहे. डिसेंबर महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील सामने १३ डिसेंबरला विशाखापट्टणम, १६ डिसेंबरला बेंगळुरू आणि १९ डिसेंबरला अहमदाबाद येथे होणार आहेत. घरच्या मैदानावर, ओळखीच्या परिस्थितीत धावा काढल्यामुळे त्यांना काहीसा दिलासा मिळू शकेल. श्रीलंकेविरुद्धची आगामी मालिका त्यांच्यासाठी आपली योग्यता सिद्ध करण्याची एक महत्त्वाची संधी ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT